Assembly Election : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये डॉ. झिशान हुसेन यांनी वंचित बहुजन आघाडीची धोकेबाजी केली आहे. माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजहर हुसेन यांनी या सगळ्यात आपल्या मुलाचा राजकीय बळी दिला आहे. या सर्व व्यवहारांमध्ये काँग्रेसने डॉ. झिशान हुसेन यांना कोट्यवधी रुपये दिले. याशिवाय काँग्रेसने लेखी स्वरूपात हुसेन यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेण्याची हमी दिली आहे. सोनुली येथील मदरशाचे संचालक रौशन मुफ्ती हे या सर्व व्यवहारांमध्ये मध्यस्थी होते, असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी (4 नोव्हेंबर) अकोल्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे यांच्यासह वंचितचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांनी हुसेन यांना संधी दिली होती. परंतु माजी मंत्री अजहर हुसेन आणि झिशान हे धार्मिक अमिषांना बळी पडले. काँग्रेसने आपली अवस्था काय केली, याचा विसर अजहर हुसेन यांना पडला. त्यामुळे त्यांनी पुन्हा काँग्रेसला साथ दिली. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळेच शेणाला सोन्याचे भाव आले. झिशान यांना काँग्रेसकडून कोट्यवधी रुपये आणि आमदारकीची ऑफर देण्यात आली.
अग्रवाल, साजिद यांना विरोध
यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर ‘द लोकहित’शी बोलताना म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी विजय अग्रवाल आणि साजिद खान पठाण यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही. साजिद खान पठाण आणि विजय अग्रवाल या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला अकोला शहर बरबाद करायचे नाही. पहिला उमेदवार दंगलखोर आहे. दुसरा उमेदवार लुटारू आहे. या सगळ्यांची मिलीभगत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतरच संबंधित उमेदवाराला पाठिंबा जाहीर करेल.
सद्य:परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून हरीश अलीमचंदानी, राजेश मिश्रा आणि डॉ. अशोक ओळंबे या नावांवर विचार सुरू आहे. सगळ्यात जास्त विचार सध्या वंचित बहुजन आघाडी अलीमचंदानी यांच्याबाबत करीत आहे. या तिघांपैकी जो उमेदवार भाजप किंवा काँग्रेस सोबत जाणार नाही, त्याच उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी आपला पाठिंबा देईल, असे पुंडकर म्हणाले. अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यात जातीय दंगलींचे प्रमाण वाढले आहे. या दंगलींमध्ये निष्पाप लोकांचा बळी जात. सामान्य लोकांना अनेक दिवस संचार बंदीमुळे उपाशी राहावे लागते. सामान्य अकोलेकरांचे सण आणि उत्सव खराब होतात. त्यामुळे यापुढे वंचित बहुजन आघाडी कोणत्याही कट्टरवादी उमेदवाराला पाठिंबा देणार नाही.
धडा शिकवला जाईल
कट्टरवादाच्या नावाखाली वंचित बहुजन आघाडीशी धोकेबाजी करणाऱ्यांना योग्य वेळी धडा शिकवला जाईल, अशी भूमिका ही पक्षाच्या अनेक नेत्यांनी आता घेतली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर झिशान हुसेन हे स्वतः वंचित बहुजन आघाडीकडे आले होते. प्रकाश आंबेडकर यांना त्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी अक्षरश: विनवणी केली. साजिद खान यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसने झिशान यांच्यासोबत कशी वर्तवणूक केली याचा मात्र त्यांना विसर पडला. स्वतः राहुल गांधी यांनी झिशान यांच्या उमेदवारीवर काट मारली. तरीही हुसेन परिवार काँग्रेसच्या खोट्या आश्वासनाला बळी पडला, अशी खंत आणि संताप वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केला.