Assembly Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सतत या ना त्या कारणाने घमासान सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा महामुकाबला रंगला होता. सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी पवार विरुद्ध पवार असा महामुकाबला रंगणार आहे.
गुरुवारी (24 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून आहे.
हाय व्होल्टेज मतदारसंघ
लोकसभा निवडणुकीच्या वेळी बारामती हा हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरला होता. कारण या निवडणुकीत सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून तर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उभ्या होत्या. या निवडणुकीत शरद पवारांची जादू चालली. सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्या. ही निवडणूक थेट नणंद भावयजय यांच्यातला सामना होती. तरीही ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीही होती. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. बारामती पु्न्हा चर्चेत आहे.
आता विधानसभेत काका-पुतण्याची लढाई पुन्हा रंगणार आहे. युगेंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने तिकिट दिलं आहे. तर अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणार आहेत. त्यामुळे बारामतीत काका-पुतणे म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगणार आहे. या निवडणुकीत नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Assembly Election : महायुतीच्या २७८ जागांचा फॉर्मुला ‘फायनल’!
कोण आहेत युगेंद्र पवार ?
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपूत्र आहेत. विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या खजिनदार पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती,इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली आहे. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे देखील अध्यक्ष आहेत.
पक्षफुटीनंतर फ्रंटवर
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर युगेंद्र पवार शरद पवारांसाठी सक्रीय झाले. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार यांनी अख्खी बारामती पिंजून काढली. त्याचवेळी युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीत बारामतीतून उमेदवार असतील अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.