Assembly Election : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांना प्रचंड विरोध होत आहे. भाजपने विजय अग्रवाल यांच्या ऐवजी हरीश अलीमचंदानी यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा जाहीर करावा अशी मागणी भाजपमधून आणि मतदारांमधून होत आहे. या सर्व चढाओढीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अकोल्याचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांना विजयी करा, असा उल्लेख जाहीर सभेत केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे जाहीर सभेला संबोधित केले. विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली. या सभेमध्ये योगींनी हरीश पिंपळे आणि अकोटचे उमेदवार तथा विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांचे नाव अगदी योग्य घेतले. परंतु अकोल्याचा विषय आला त्यावेळी विजय अग्रवाल यांच्या ऐवजी योगी आदित्यनाथ यांनी वसंत खंडेलवाल यांचे नाव घेतले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
उमेदवार बदलाची चर्चा
अकोल्याच्या गल्लीतील लहान मुलापासून संघाच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सगळ्यांचाच विजय अग्रवाल यांच्या नावाला विरोध आहे. भारतीय जनता पार्टीसाठी टिपू सुलतान हे नाव समर्थकांच्या यादीत नाही. अशातही विजय अग्रवाल यांनीच अकोला महानगरपालिकेच्या सभागृहाला टिपू सुलतान यांचे नाव दिले. हे नाव देताना टिपू सुलतान यांचा उल्लेख विजय अग्रवाल यांनी शहीदे आजम असा केला होता. त्यामुळे विजय अग्रवाल यांच्या भाजपमधील हिंदुत्वावर आजही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप मधील सर्वांनीच विरोध सुरू केला. मतदारांमध्ये निर्माण झाली. अशातच भाजपचे नेते हरीश अलीमचंदानी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
विजय अग्रवाल हे जरी भाजपचे उमेदवार असले तरी त्यांच्या ऐवजी भाजपने हरीश अलीमचंदानी यांना पाठिंबा द्यावा, अशी सूचना संघाकडून भाजपला करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीकडून अखेरच्या क्षणी विजय अग्रवाल यांच्या ऐवजी हरीश अलीमचंदानी यांना पाठिंबा दिला जाऊ शकतो असा दावा आता केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीने तर या संदर्भात थेट दावाच केला आहे. या सर्व परिस्थितीत अत्यंत जबाबदार नेता असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विजय अग्रवाल यांच्या ऐवजी वसंत खंडेलवाल यांचे नाव घेणे म्हणजे एखादा संकेत तर नाही ना? अशी चर्चा आता होत आहे.
गडकरींचे समर्थक
अकोल्याचे वसंत खंडेलवाल हे विधान परिषदेचे आमदार आहेत. सराफा व्यापारी असलेले वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थक आहेत. हरीश अलीमचंदानी यांना भाजपमध्ये जशी वागणूक मिळाली थोड्याफार फरकाने तसेच वागणूक खंडेलवाल यांना मिळाल्याचे भाजपचे कार्यकर्ते सांगतात. लोकसभा निवडणुकीच्या काळात अशा वागणुकीमुळेच वसंत खंडेलवाल यांचा पारा चढला होता. या परिस्थितीत योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे नाव घेणे नेमके काय सांगून जाते, याची चर्चा अकोल्यात सुरू झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडून योगी आदित्यनाथ यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे.