Yavatmal News : किर्गीस्तान या देशात स्थानिक आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. या संघर्षामध्ये पाच विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले यवतमाळ जिल्ह्यातील पाच विद्यार्थी त्याठिकाणी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना केन्द्र सरकारने सुखरुप मायदेशी आणावे अशी मागणी आज यवतमाळ शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, ओमप्रकाश तिवारी यांनी परराष्ट्रमंत्री यांना जिल्हाधिका-यां मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पाच विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी किर्गीस्थान येथे गेले आहेत. सध्या किर्गीस्थान येथे भारतीय आणि पाकिस्तान मधील विद्यार्थ्यांवर स्थानिक विद्यार्थी हल्ले करीत आहेत. यामध्ये आतापर्यंत चार पाकिस्तानी विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. सुदैवाने यवतमाळचे विद्यार्थी सुखरूप आहेत. पण, किर्गीस्थान येथील गंभीर परिस्थितीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. त्यांच्या पालकांनी सरकारला या विद्यार्थाना मायदेशात सुखरूप आणण्याची विनंती केली आहे.
kyrgyzstan Attack : यवतमाळच्या पाच जणांना मायदेशी आणेल का सरकार?
14,500 विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी
भारतातील असंख्य विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाकरिता आणि इतर अभ्यासक्रमाकरिता परदेशी जातात. अशातच भारतातील जवळपास 14,500 विद्यार्थी शिक्षणासाठी किर्गीस्थान येथे गेले आहेत. यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पाच विद्यार्थी किर्गीस्थानची राजधानी ब्रिस्टेक येथे वैद्यकीय अभ्यासक्रमा करिता गेले आहेत. स्थानिक आणि इजिप्शिअन विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने संघर्ष पेटला आहे. आता स्थानिक विद्यार्थी इतर सर्वच देशातील विद्यार्थाना आपला निशाणा बनवित आहे. यामुळे आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेबाबत यवतमाळचे पालक चिंताग्रस्त आहेत.त्यामुळे पालकांची मन:स्थिती पाहता सदर प्रकरणात सरकारने तातडीने कारवाई करण्याची मागणी चंद्रशेखर चौधरी, ओमप्रकाश तिवारी यांनी केली आहे.