Amravati Constituency : अमरावती लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला जाण्याच्या मार्गावर आहे. अमरावतीमध्ये बळवंत वानखडे यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. लवकरच यासंदर्भातील घोषणा झाली पाहिजे. आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. आम्ही मोठ्या प्रमाणात श्रम करीत आहोत. महाविकास आघाडी अमरावती लोकसभा मतदारसंघात नक्कीच विजयी होईल, असा ठाम विश्वास असल्याचे माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या (Congress) आमदार ठाकूर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ठाकूर म्हणाल्या, अमरावतीमधून जे लोक निवडून गेले आहेत, ते दर्जेदार आणि प्रभुत्व ठेवणारे आहेत. संविधानाच्या जडणघडणीमध्ये काम करणारे ते लोक आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी राज्यपाल रा.सू. गवई सुद्धा अमरावती मतदारसंघातूनच आहेत. अमरावतीचा इतिहास आणि दर्जा त्यांनी टिकवून ठेवला होता. महाविकास आघाडीत हा दर्जा टिकवून ठेवला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमरावतीकर लवकरच योग्य उमदेवार निवडून देतील.
संविधान महत्वाचे
देशाचे संविधान महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचे आहे. संविधान काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या केंद्रस्थानी आहे. संविधान टिकले पाहिजे. संविधानाचे पालन झाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात नौटंकीबाजी झाली आहे, असे नमूद करीत त्यांनी नाव न घेता रवि राणा आणि नवनीत राणा दाम्पत्यावर टीका केली. अमरावतीत कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाही. अमरावतीत जिल्ह्यात कोणतेही उद्योग नाहीत. येथील बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. अर्थसंकल्पात आणलेल्या कामांचे श्रेय विद्यमान खासदार घेत आहेत. स्वत:चे नाव त्या मिरवित आहेत, असे ठाकूर म्हणाल्या.
अमरावतीच्या मतदारांना सगळे काही ठाऊक आहे. ही नौटंकी आता चालणार नाही. असे खपवून घेणार नाही, अशा मूडमध्ये सध्या मतदार आहेत. विद्यमान खासदार सत्ताधाऱ्यांसोबत गेल्या तरी अमरावतीचा कोणताही फायदा झाला नाही. त्या सत्ताधाऱ्यांसोबत होत्या. त्यामुळे अमरावतीचा कायापालट व्हायला पाहिजे होता. मात्र तो झाला नाही. केवळ घोषणांचा फुसका बार ठरला आहे. त्यामुळे अमरावतीची जनता यंदा न्याय करेल असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.