भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नाकारली. परवानगी नाकारणे म्हणजे जिल्ह्यातील इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरणे होय. ही वेळ का आली याची कारणमीमांसा व्हावी, असे आवाहन माजी खासदार सुनील मेंढे यांनी केेले आहे. त्याचवेळी विद्यमान आमदार, खासदारांची अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची इच्छाशक्ती कमी पडली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
भंडारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. त्यानंतर या सत्रात पहिली 100 विद्यार्थ्यांची बॅच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पथकाने जून महिन्यात केलेल्या पाहणीत अनेक त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे परवानगी नाकारल्याचे मेंढे यांनी (2 सप्टेंबर) पत्रकार परिषदेत सांगितले.
सुनील मेंढे म्हणाले, ‘मी राज्य शासनाचे मंत्री, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा केला. हे महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला होता. सुरुवातीला जसा पाठपुरावा झाला, तसा नव्या खासदारांकडून झाला नाही. प्राध्यापकांच्या नियुक्ती, बायोमेट्रिक न बसविणे, पुस्तके, फर्निचर, वसतिगृह या बाबी अधिष्ठात्यांकडून खासदार आणि आमदारांनी करून घेणे अपेक्षित होते. मात्र, ते अपयशी ठरले,’ अशी टीका मेंढे यांनी केली.
मेंढे म्हणाले, ‘या विषयात मी राजकारण करणार नाही. मात्र, डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. अनियमितता आणि त्रुटीचे कारण पुढे करीत या महाविद्यालयाची मान्यता आयोगाने नाकारली आहे. आयोगाच्या या निर्णयाला वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्र्यांकडे आव्हान देणार आहे. मान्यता पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असेही सुनिल मेंढे म्हणाले.
माजी खासदाराचे ‘लक्ष्य’ कोण
भंडारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा पुन्हा रखडला आहे. गेल्या जून महिन्यात पाहणीसाठी आलेल्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पथकाच्या निदर्शनास त्रुटी आल्या. त्यामुळे या शैक्षणिक सत्रात महाविद्यालय सुरू करण्याची मान्यता नाकारण्यात आली आहे. या मुद्द्यावरून आता आजी आणि माजी खासदारांमध्ये वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
स्वतः डॉक्टर असूनही
भाजप नेते माजी खासदार सुनील मेंढे यांनी पुढील सत्रात हे महाविद्यालय सुरू होईलच, असा शब्द दिला होता. मात्र, त्रुटींमुळे विषय रखडला आहे. सुनील मेंढे यांनी यासाठी विद्यमान खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना जबाबदार ठरविले आहे. स्वतः डॉक्टर असलेल्या खासदारांना पाठपुरावा करता आला नाही. त्यामुळे मान्यता नाकारली जाण्याची नामुष्की आली. हे त्यांचे अपयश आहे, अशा शब्दांत मेंढे यांनी आता थेट अंगुलीनिर्देशच केला आहे.
एका दगडात दोन पक्षी
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. तिकिटांच्या मागणीवरून शिंदे गटाचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भाजपमध्ये ओढाताण सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदारांएवढीच स्थानिक आमदारांचीही जबाबदारी होती, अशी पुस्ती जोडून सुनील मेंढे यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. बाकी काही का असेना, भाजपला निवडणुकीच्या तोंडावर विषय मिळाला, हे मात्र खरे!