महाराष्ट्र

Chief Minister Scheme : भावंड सुटीवर; ‘बहिणी’ वाऱ्यावर!

Revenue Department : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला महसूल संपाचा फटका

महसूल विभागातील भावंड बेमुदत संपावर गेल्यामुळे लाडक्या बहिणींचे सर्वत्र हाल होत आहेत. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचा संप अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची कार्यवाही ठप्प पडली आहे. अनेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे आता सरकारने उपाय शोधल्याशिवाय किंवा भावंडांनीच एक पाऊल मागे घेतल्याशिवाय तोडगा निघणार नाही, हे निश्चित.

राज्यातील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे नागरिकांची विविध कामे खोळंबली आहेत. याचा फटका आता ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला बसला आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तहसील कार्यालयातून प्राप्त होतात. आणि कर्मचारी संपावर असल्याने कागदपत्रे काढण्यास विलंब होणार आहे.

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्याचे निवेदन गेल्या महिन्यात सरकारला दिले. पण तरीही त्याची दखल घेतली गेली नाही. परिणामी राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या 10 जुलैला काळी फित बांधून काम केले. 11 जुलै रोजी निदर्शने केली. तर 12 जुलै रोजी लेखनी बंद आंदोलन केले. आता हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

दांगट समितीच्या अहवालात शिफारशी आहेत. महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध यामध्ये आहे. कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता आकृतीबंध लागू करण्यात यावा, ही प्रमुख मागणी आहे. इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. अकोला जिल्ह्यातील 222 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

ही कामे खोळंबली

विविध योजनांसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलेअर, जात प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले आहे. महसूल विभागामधून अन्य दस्तावेज मिळण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम झाला आहे. महसूल विभागातील कार्यालये ओस पडली आहेत, तर बाहेर मात्र कामासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी होत आहे. या संपाचा फटका आता सरकारने सुरू केलेल्या योजनांही बसत आहे.

Shiv Sena : अरविंद सावंत पदाधिकाऱ्यांवर भडकले!

लाडक्या बहिणीला होतोय त्रास!

योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. त्यामुळे महसूल तसेच शासकीय कार्यालयात मोठी गर्दी होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या शिधा पत्रिकेत नाव लावणे, नाव कमी करण्यासाठी शपथपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे काढण्यासाठी गर्दी होत आहे. प्रत्येकजण संप मिटण्याची वाट बघत आहे. विशेषतः खेडापाड्यांमधून शहरात येणाऱ्या महिलांना रिकाम्या हाताने गावी परतावे लागत आहे.

संप आणखी तीव्र होणार!

विविध मागण्यांसाठी सुरू असलेला महसूल कर्मचाऱ्यांचा संप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना व राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पाठिंबा दिला आहे. एकूणच कर्मचाऱ्यांचा हा संप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात कामकाज आणखी प्रभावित होण्याची शक्यता आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!