महाराष्ट्र

Shegaon News : महिला वाहकाचा विनयभंग

Molestation Case : आगार प्रमुखावर गुन्हा दाखल; आरोपी फरार

आगार प्रमुखाने महिला वाहकाचा विनयभंग केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव बस स्थानकावर घडली. बुधवार, दि. २१ ऑगस्टला दुपारच्या वेळी पीडित महिला स्थानकावर कामावर असताना आगार प्रमुखाने हा प्रकार केला. महिला वाहकाच्या तक्रारीवरून शेगाव एसटी आगारचे प्रमुख गोविंदा जवंजाळ यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे गुन्हा दाखल होताच आरोपी आगार प्रमुख फरार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

शेगाव येथे आगार वाहक म्हणून कार्यरत ३५ वर्षीय महिला वाहकाचा विनयभंग झाला. आगार प्रमुख गोविंदा जवंजाळ यांनी हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना २१ ऑगस्टला दुपारी घडली. याबाबत पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, ‘मी नेहमीप्रमाणे सकाळी 6.30 वाजता शेगाव बस डेपो येथे कामावर आले. तेव्हा मला शेगाव ते खामगाव फेऱ्या करणारी क्रमांक १० नंबरची ड्युटी होती. परंतु गाडी उपलब्ध नसल्याने मी डेपोमध्ये योगेश बांदे यांच्या कार्यालयात बसून होते. दुपारी १ वाजता डेपो मॅनेजर गोविंदा जवंजाळ यांच्या कॅबीनमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी माझा हात पकडून वाईट उद्देशाने बेंचवर बसवले. त्यामुळे मी घाबरून गेले. नंतर त्यांना मी विचारले की, तुम्ही हे काय करताय? त्यानतंर ते सुद्धा घाबरले आणि तेथून बाहेर पडले. घटना घडली त्यावेळी तेथे कोणीच हजर नव्हते.’

पीडित महिलेच्या तोंडी रिपोर्टवरुन डेपो मॅनेजरविरुद्ध कलम ७४ भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कर्मचारी प्रमोद पोहरे आणि मोहम्मद रिझवान यांच्यासोबत पीडित महिलेने शहर पोलीस स्टेशन गाठले. आणि त्यानंतर रीतसर तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आगार प्रमुख गोविंदा जवंजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी जवंजाळ फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या संदर्भात जवंजाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ते उपलब्ध झाले नाहीत. अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रमोद पोहरे यांनी केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!