NCP Press आम्ही राज्यात ‘एकच लक्ष, विधानसभा क्षेत्र’ हे सूत्र घेऊन काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे 4 जूनच्या निकालाची वाट न बघता राज्यभरात संघटना वाढीसाठी आणि संघटना अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हानिहाय आढावा घेऊन पावले उचलली जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
27 मे रोजी सकाळी 11 ते 1 यावेळेत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक गरवारे क्लब हाऊसमध्ये होणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय नेते अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मंत्री, आमदार, पक्षाचे लोकसभा उमेदवार, सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
10 जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन आहे. त्यानुसार मुंबई, दिल्ली याठिकाणी कार्यक्रमाची तयारी व नियोजन होणार्या बैठकीत कोअर कमिटीच्या ग्रुपमध्ये चर्चा केली जाणार असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले.
पक्ष प्रवेश राजकारणाला कलाटणी देणारा
या बैठकीत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. देशाच्या, राज्याच्या, पक्षाच्या, राजकारणाला कलाटणी देणारा हा प्रवेश असेल असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करुन महायुतीच्या समन्वय समितीची बैठक लवकर बोलावण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूकीचा आढावा आणि पुढचे नियोजन यासंदर्भात पावले उचलावीत यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिक सक्रियदृष्ट्या दक्ष राहून अधिक ग्रामस्तर ते राज्यपातळीवर काम करण्याचे नियोजन करत आहे.
नैसर्गिक आपत्तीत आचारसंहिता शिथिल करा
राज्यात तीव्र पाणी टंचाई आहे. दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना बसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मराठवाड्यात बैठक घेतली. गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे ज्याठिकाणी पाणीटंचाई तीव्रतेने भासते आहे त्याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करत किंवा अन्य उपाययोजना करुन जनतेला उपलब्ध होईल यादृष्टीने राज्य सरकारने उपाययोजना कराव्यात. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. माझ्या लोकसभा मतदारसंघातही फटका बसला आहे. आंबा, काजू बागायतदारांचे नुकसान झाले आहे. खरीपाची पिके हातातोंडाशी आली होती त्याचेही नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये लागू असलेली आचारसंहिता शिथील करावी अशी विनंती राज्य सरकारकडे केली आहे असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.
The Lokhit Impact : हुश्श्य..! झाली एकदाची उड्डाणपुलाची दुरुस्ती सुरू
आता प्रत्येकाचे ४ जूनला लागणार्या निकालाकडे लक्ष आहे. देशात काय होणार, राज्यात काय होणार ही चर्चा सुरू आहे. एकंदरीत जनतेचा कौल महायुतीला मिळेल असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
पृथ्वीराज चव्हाणांनी 48-0 सांगायला हवे
पृथ्वीराज चव्हाण यांनी 48 – 0 सांगायला हवे होते. त्यांचा इतका गाढा अभ्यास आणि महाराष्ट्रात त्यांची कर्तबगारी चार वर्षे महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यामुळे चंद्र – सूर्य असेपर्यंत पृथ्वीराज चव्हाण राज्यात मुख्यमंत्री राहिले पाहिजेत अशी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची अपेक्षा आहे असा जोरदार टोला सुनील तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना लगावला.