Makeover : राज्यामध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सक्रिय झाले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हटल्यावर नागपूरचा विकास होणार यात शंकाच नाही. मुख्यमंत्री होताच फडणवीस यांनी नागपूरमधील विधान भवनाच्या मेकओव्हरचे काम हाती घेतले आहे. महायुती सरकारच्या यापूर्वीच्या कार्यकाळात नागपूरमधील विधान भवनाचा कायापालट करण्यास सुरुवात झाली. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रकल्प सुरू केला होता.
महायुती सरकारच्या दुसऱ्या इनिंगमध्ये नार्वेकर हेच विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे विधान भवनाचे काम आता वेगाने सुरू होणार आहे. त्याचे संकेतही नागपूर मध्ये दिसत आहेत. मंजूर झालेल्या प्रकल्पानुसार नागपूर मध्ये सेंट्रल हॉल उभारला जाणार आहे. नवीन विधान भावनातील कामकाज पेपर लेस राहणार आहे. यंदा नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी स्क्रीन देखील लावण्यात आल्या आहेत.
मोठ्या प्रमाणावर निधी
2026 मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे विधिमंडळाची सदस्य संख्या 288 वरून 350 होणार आहे. त्यामुळे नागपूर येथील विधान भवनाचा विस्तार करणेही गरजेचे होणार आहे. नव्या प्रस्तावानुसार विधानभवनातील सर्व कार्यालय एकाच छताखाली आणण्यात येणार आहेत. विधान भवनाच्या मागील बाजूला असलेल्या शासकीय मुद्रणालयाची दोन एकर जागा देखील सरकार ताब्यात घेणार आहे. त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
विधान भवन परिसरात पुनम प्लाझा ही इमारत आहे. इमारत देखील प्रशासनाकडून संपादित केली जाणार आहे. या संदर्भातील आदेश नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विधान भवनाची मूळ इमारत ऐतिहासिक वास्तू आहे. लाल रंगाच्या या मूळ वास्तूला धक्का न लावता विस्तार केला जाणार आहे. सध्याचे विधान भवन इमारतीत मध्यवर्ती सभागृह नाही. त्यामुळे राज्यपालांचे अभिभाषण येथे घेता येत नाही. विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य एकत्रपणे बसतील अशी ही व्यवस्था नाही. त्यामुळे नवीन इमारतीत ही व्यवस्था केली जाणार आहे.
प्रशस्त केबिन
नव्या विधान भवनाच्या इमारतीमध्ये सर्व मंत्र्यांना प्रशस्त असे कक्ष मिळणार आहे. त्याचे डिझाईन तयार करण्याचे काम सुरू आहे. हैदराबाद हाऊस आणि अन्य ठिकाणी असलेल्या सर्व कार्यालयांना एका ठिकाणी आणण्यात येणार आहे. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूरचे असल्याने या प्रक्रियेला फारसा वेळ लागणार नाही असे सांगण्यात येत आहे. नागपूर शहरात वाहतूक व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे.
हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये असताना रिझर्व बँक चौक ते सिव्हिल लाइन्स परिसरात वाहतूक खोळंबा होतो. याशिवाय झिरो माइल चौक ते रिझर्व बँक चौक येथे देखील वाहतूक अडते. विधिमंडळाच्या दोन किलोमीटर वर्तुळातील वाहतूक अधिवेशन काळामध्ये प्रभावित होते. नवीन इमारत झाल्यानंतर वाहतुकीचा हा खोळंबा देखील दूर होणार आहे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.