या लेखातील मतं लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असं नाही.
Assurance From Leaders : सर्वच क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मोठ्या कंपन्याही हैराण आहेत. आपली उत्पादने ग्राहकांनी घ्यावीत, यासाठी ते नवनवीन युक्त्या शोधताना दिसतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या सवलती, ऑफर देण्यात येत आहेत. आपल्या कंपन्यांची उत्पादने इतर कंपन्यांच्या उत्पादनापेक्षा कशी सरस आहेत? हे सांगण्याची कसरत त्यांचे मार्केटिंग प्रतिनिधी करताना दिसतात. हे सारे गणित ज्याला व्यवस्थित जमते तोच पुढे जाताना दिसतो.
तरुणांना रोजगाराच्या समस्या भेडसावत आहेत. नोकरी शोधणे व ती मिळणे मोठे कठीण होऊन बसले आहे. रिक्त जागांच्या तुलनेत नोकरी मिळविण्याच्या रांगेत असणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी जास्त आहे. उच्च शिक्षित मुलांना सहजासहजी नोकरी मिळत नाही. अभियंता, नेट-सेट सारख्या परीक्षा उत्तीर्ण झालेले पदवीधर बेरोजगार आहेत. स्पर्धा परीक्षा देऊन त्यात टिकावं लागणे सोपे नाही. प्रयत्न करूनही अनेकांना भाग्य हुलकावणी देत आहे. या विचित्र परिस्थिती मुळे बरेच तरुण नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. मुलांची ही अवस्था बघून आई वडील बेचैन होत आहेत. अनेक जण आपले क्षेत्र सोडून इतर ठिकाणी नोकरी करतांना दिसतात. याही पेक्षा विदारक स्पर्धा सध्या राजकारणात दिसून येत आहे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मोठे पक्ष धडपडत आहेत.
जनतेचा कळवळा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होत आहे. दिवस अगदीच कमी राहिले आहेत. निवडणूक प्रचार दणक्यात सुरु झाला आहे. मतदार आपल्या पक्षाकडे कसे आकर्षित होतील, याचा विचार करून जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. काहींनी त्याला वचननामा असे भारदस्त नाव दिले आहे. सर्वच पक्षांना जनतेचा कळवळा आला आहे. जनतेच्या हितासाठी काय काय करू असे त्यांना झाले आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात खरी चुरस आहे. बंडखोरीचे आव्हान महायुती आणि महाविकास आघाडी यांचे समोर आहेच. सत्ता आपलीच यावी यासाठी दोन्ही बाजूंनी जोरकस प्रयत्न होताना दिसतात. त्यामुळे आश्वासने देताना प्रत्येक जण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. निवडणुकीत यश संपादन करुन पुन्हा सत्ता सूत्रं आपल्याकडेच राहावी, यासाठी त्यांचे जोरकसपणे प्रयत्न सुरू आहेत. तीन महिन्यांपासून महायुतीतर्फे त्याची तयारी सुरू आहे. अनेक लाभकारी योजनांची सुरूवात हा त्यातलाच एक भाग आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट सामिल आहे. आता हे तीनही पक्ष पुन्हा सत्ता काबीज करण्याचे हेतूने जेरीस पेटले आहेत.
केलयं काम भारी
राज्यातील महायुतीचे सत्ताधारी सर्वच बाबतीत ‘लय भारी’ आहे. त्यांनी आपल्या सरकारने राबविलेल्या योजनांची जाहिरातबाजी करणे सुरू केले आहे. ‘केलयं काम भारी. आता पुढची तयारी’ या जाहिरातींमधून सरकारच्या कामाचा उहापोह करण्यात आला आहे. महायुती विकासासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द या जाहिरातीमधून देण्यात आला आहे. महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत बहिणींना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येते. ही योजना लोकप्रिय ठरली. आता महायुती पुन्हा सत्तेवर आल्यास या रकमेत वाढ करून ती 2 हजार 100 रूपये करण्यात येणार आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात नोकरी देण्याचे अभिवचन महायुतीने आपल्या वचननाम्यातून दिले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15 हजार रुपये, कृषी मालाला हमीभाव, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणे, ही आश्वासने देण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा यांनीही आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांचे मानधन 15 हजार करण्याचे अभिवचन देण्यात आले आहे.
आणखीही वचन
अडीच लाख तरुणांना नोकऱ्या, 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन, ग्रामीण भागात 45 हजार पांदण रस्त्याचे बांधकाम , वृद्ध पेन्शन धारकांना 2 हजार 100 रुपये पेन्शन, अशी अभिवचने देण्यात आली आहेत. महाविकास आघाडी ही आश्वासनांचे चॉकलेट आणि घोषणांचे चुइंगम देण्यात मागे नाही. महायुतीतर्फे बहिणींना दीड हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येते. महाविकास आघाडी या रकमेत वाढ करून बहिणींना तीन हजार रुपये देणार आहे. यासाठी महालक्ष्मी योजना आणण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
एसटीच्या प्रवासात तिकीट दरात महिलांना 50 टक्के सवलत मिळते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास महिलांना मोफत एसटी प्रवास करण्याची योजना सुरू करण्यात येणार आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा तीन हजार रुपये खटाखट, पटापट जमा होतील, असे मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जाहीर केले. बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजार रुपये देण्यात येतील, असे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची काळजी
शरद पवार यांनी घोषणा केलेल्या कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा वचननामा जाहीर केला. मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देण्याचे अभिवचन त्यांनी दिले आहे. नवीन गृहनिर्माण धोरण आखण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले. राज्यात निवडणूक प्रचाराला वेग येत आहे. प्रमुख नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी सुरू आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत.
लाभकारी योजनांची मुहूर्तमेढ या निवडणुकीपासून करण्यात आली आहे. सरकार कोणाचेही आले तरी जाहीर केलेल्या योजना राबविण्याची मोठी जबाबदारी सत्तासुत्रे सांभाळणाऱ्यांवर येणार आहेत. या योजना नेहमी साठी सुरू ठेवणे सोपे नाही. आर्थिक निधी कसा आणि कुठून उभारणार यांचे समर्पक उत्तर कोणाकडेही नाही. अशा योजना राबवून जनतेच्या चेहऱ्यावर कायमस्वरुपी हास्य टिकवून ठेवणे म्हणावे तेवढे सोपे नाही. याउपरही मतदारांचा आशीर्वाद कोणाला मिळेल हे सांगता येत नाही. राजकारणातील जांगडगुत्ता आणि टोकाची स्पर्धा त्यास कारणीभूत आहे. राजकारणात हमसे बढकर कोन चे प्रयोग सुरू आहेत. आता सिकंदर कोण ठरणार याची उत्सुकता वाढली आहे.