Political War : अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली आणि राज्यातील राजकारण चांगलेच तापले. लंकेंच्या या भेटीने अजित पवार गटाला आयतं कोलितच मिळाले. आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात उडी घेत निलेश लंके यांना चांगलंच धारेवर धरलं. लोकसभेत मदत केली म्हणून आभार मानायला लंके गेले होते का, असा सवाल केला. याशिवाय मिटकरींनी पार्थ पवार प्रकरणाचीही आठवण करून देत त्यावेळी अजित पवारांनी जशी कानउघडणी केली होती तशी निलेश लंकेंची कानउघडणी तुतारी पवार करणार का, असाही सवाल केला. यासर्वांत निलेश लंके यांच्याकडूनही आमदार अमोल मिटकरींना जोरदार प्रत्युत्तर मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे अहमदनगर चे खासदार निलेश लंके यांचा गुंड गजा मारणे सोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे. लंके यांनी गजा मारणे यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. दरम्यान, सोशल मीडियावर खासदार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीकाही सुरू झाल्या. राजकीय वर्तुळातूनही जोरदार टीका सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटातील आमदार अमोल मिटकरी यांनीही टीका करत खासदार लंके यांच्यावर आरोप केले. दरम्यान, आता या टीकेला प्रत्युत्तर देत स्वतः खासदार निलेश लंके यांनी गजा मारणेच्या भेटीवर स्पष्टीकरण दिले. पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात राजकीय वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
पार्थ पवारही भेटले होते मारणेला?
खासदार लंकेंची ती भेट लोकसभा निवडणुकीचे आभार मानायला होती का? असा सवाल मिटकरी यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेची घेतलेली भेट ही लोकसभेत त्याने केलेल्या मदतीचे आभार मानायला होती का?, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींनी उपस्थित केला आहे. गजा मारणेने बारामती आणि नगरमध्ये शरद पवार गटाला मदत केली का?, असा सवालही यावेळी मिटकरींनी करीत लंके यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तर पार्थ पवारांनी मारणेच्या भेटीनंतर अजित पवारांनी केलेल्या कानउघडणी सारखी लंकेंचीही कानउघडणी तुतारी पवार गट करणार का? अशा शब्दांत मिटकरी यांनी सवाल केला आहे.
खासदार लंकेंचे प्रत्युत्तर
आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेवर खासदार निलेश लंके म्हणाले की, अमोल मिटकरी यांना काही परिस्थिती माहित आहे का? जरा परिस्थितीची जाणीव करून घ्या. पक्षाने मीडियासमोर बोलण्यासाठी ठेवले आहे म्हणून तुम्ही काहीही बोलणार का? असा घणाघात त्यांनी मिटकरींवर केला आहे.
Varsha Gaikwad : अण्णांनी शिंदे यांच्या विरोधात न्यायालयात जावे
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पक्षाची भूमिका मांडत. गजा मारणे गुन्हेगार आहे. याबाबत नीलेश लंके यांना माहिती नव्हती. मी त्यांना ऑफीसकडून संपर्क साधून खुलासा मागितला. यावर त्यांनी सांगितले की, पुण्यात एका पहिलवानाचा मृत्यू झाला. त्यांच्या घरी ते भेट देण्यासाठी गेले होते. तिथं गजा मारणे याने सत्कार केला. मुळात हा व्यक्ती कोण आहे, याची महिती लंके यांना नव्हती. त्यांनी यापुढे अशी चूक होणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं असल्याचं म्हटलं आहे.