महाराष्ट्र

Eknath Khadse : लागली ‘भाजप’ प्रवेशाची ओढ

Maharashtra Politics : राजकीय 'घडी' सुरळीत करण्याचा प्रयत्न!

या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असे नाही.

BJP : एकनाथ खडसे यांची ओळख भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते अशी आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते आहेत. आता त्यांना पुन्हा आपल्या मूळ पक्षात येण्याची ओढ लागली आहे. सर्वच विरोधी पक्षांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसला. महाराष्ट्रात 50 जागा मिळवणे विरोधी पक्षांना शक्य झालेले नाही. सत्तेची आस लावून बसलेले प्रमुख विरोधी पक्ष आपले अस्तित्व कसे टिकेल? या विवंचनेत आहेत.

अशा स्थितीत आपल्या मूळ पक्षाचा आश्रय घेऊन पुन्हा विस्कटलेली राजकीय घडी सुरळीत करण्याचा हा प्रयत्न आहे. स्वतः सोबतच आपल्या मुलीच्या उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी ही जुळवून घेण्याची तयारी दर्शवित आहेत. राज्यातील नेते नाथाभाऊ यांच्या प्रवेशाला कितपत साथ देतात यावर सारे अवलंबून आहे.

निव्वळ गैरसमज

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपला मुख्यमंत्री पदावरचा हक्क डावलला गेला. या गैरसमजातून त्यांचे आणि फडणवीस यांच्या सोबत असलेल्या संबंधात दरी निर्माण झाली होती. आपल्या मनातील खदखद त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली. आता समोर दिसणारी राजकीय परिस्थिती पाहून त्यांनी आपली भूमिका थोडी मवाळ केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि आपल्यात तात्विक मतभेद आहेत. ते चर्चेतून दूर होऊ शकतात असा समेटाचा सूर ते आळवू लागले आहेत.

एकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते राहिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील राजकारणात आतापर्यंत त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे पक्षातील बहुजनांचा चेहरा म्हणून बघितले जाऊ लागले. बहुजन समाजाला भाजपसोबत जोडण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या राजकीय प्रवेशाने नाथाभाऊ यांच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली. आता जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांचे प्रस्थ वाढले आहे.

एकनाथ खडसे यांचे ते कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. देवेंद्र फडणवीस यांचा गिरीश महाजन यांचेवर विश्वास आहे. त्यामुळे नानाभाऊंच्या भाजप प्रवेशास गिरीश महाजन कसा प्रतिसाद देतात यावर बरेच अवलंबून आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे भाजपच्या केंद्रातील नेत्यांना भेटले. आपला भाजप प्रवेश झाला, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील भाजप नेत्यांनी मात्र त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. आता नाथाभाऊ नव्याने भाजप प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.

पवारांशी जवळीक

भाजपसोबत दुरावा आल्याने नाथाभाऊ शरद पवार यांच्या पक्षात गेले. त्यांना आमदारकी मिळाली. मुलीला मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. मात्र रोहिणी खडसे पराभूत झाल्या. त्यांच्या पराभवास गिरीश महाजन यांची खेळी कारणीभूत ठरली. या पराभवामुळे खडसे महाजन यांच्यात आणखी दरी वाढली. या सर्व राजकीय घडामोडीत एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांनी भारतीय जनता पक्षात आपले राजकीय स्थान

टिकवून ठेवले. 

रक्षा खडसे भाग्यवान ठरल्या. पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे फळ त्यांना मिळाले. लोकसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या. पक्षाने विश्वास दाखवून त्यांना मंत्री केले. आता त्यांचे सासरे आणि नणंद यांना राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी झुंज द्यावी लागत आहे. भविष्यात राजकारणात टिकून रहावयाचे असल्यास भाजप शिवाय पर्याय नाही हे नाथाभाऊ यांना कळून चुकले आहे.

सगळं मुलीसाठी

विशेष म्हणजे आपल्या मुलीच्या राजकीय जीवनाला योग्य दिशा द्यायची आहे. आता विरोधी पक्षात राहून कोणताही फायदा नाही या निष्कर्षाप्रत ते आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष हुरळून गेले होते. आता राज्यात आपलीच सत्ता येणार, या आविर्भावात ते वागत होते. अगदी मुख्यमंत्री पदाच्या चर्चा झडू लागल्या होत्या. या पदासाठी अनेक नावे समोर येत होती.

विधान सभा निवडणूक निकालाने सर्वांना जमीनीवर आणले. महायुतीने मोठे यश मिळवले. या निकालाने विरोधकांचे सारे मनसुबे धुळीला मिळवले. एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षाचे आजवर भरभरून दिले. अनेक महत्वाच्या पदावर कार्य करण्याची संधी दिली. ज्येष्ठ नेते म्हणून मानसन्मान ठेवला. काही कारणाने त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागते. अशा स्थितीत शांत न राहता त्यांनी आपली भूमिका बदलली. पक्ष बदलला.

हाती काहीच लागले नाही. नेहमी पक्ष मोठा असतो. त्यानंतर कार्यकर्त्यांचे नाव येते या नियमाचा त्यांना विसर पडला. आयुष्याच्या उत्तरार्धात पदाच्या लालसेपोटी तसेच मुलीच्या राजकीय भविष्याच्या काळजीने त्यांना आपला मूळ पक्ष आठवू लागला आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी त्यांचे प्रयत्न हेतू ठेवून होत आहेत. त्यात निश्चितच स्वार्थ दडलेला आहे. त्यांचा भाजपात पुन्हा प्रवेश झाला, तरी पक्ष त्यांच्याकडे किती गांभीर्याने बघतो यावर त्यांचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!