Akola Constituency : लोकसभेच्या रणधुमाळीत मतदारही जागरूक आहेत. उमेदवारालाच थेट जाब विचारला जात आहे. असाच काहीसा प्रकार वाशीम जिल्ह्यात घडला. लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे मतदारसंघात फारसे दिसून आले नसल्याचा आरोप करीत त्यांचे पुत्र व भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रचार करताना रोषाचा सामना करावा लागला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाशीम जिल्ह्यातील रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघ हा अकोला लोकसभा मतदारसंघात येतो. मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे अनुप धोत्रे प्रचारासाठी गेले असता, त्यांना नागरिकांनी दहा वर्षांत काय केले ? तुमचे वडील खासदार असताना आमचे गाव दिसले नाही का? आता तुम्ही निधी दिल्याचे सांगता, त्यामुळे तुम्हाला आम्ही मतदान का करावे ? असा जाब ग्रामस्थांनी विचारला. भाजपचा बालेकिल्ला असलेला अकोला लोकसभा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीचे केंद्रस्थानही आहे.
संजय धोत्रे हे भाजपच्या तिकिटावर येथून चार वेळा निवडून आले आहेत. आता त्यांचा मुलगा अनुप धोत्रेंना भाजपने उमेदवारी दिली आहे. प्रकृती बरी नसल्याने संजय धोत्रेंनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. वंचित कडून प्रकाश आंबेडकर तर काँग्रेसचे डॉ. अभय पाटील रिंगणात आहेत.
अनुप धोत्रे यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांचा प्रचार सुरू आहे. मतदारांशी गाठीभेटी घेताना संजय धोत्रे यांनी आमच्यासाठी काहीही काम केले नसल्याचे सांगून काही मतदार नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यांच्या प्रचार रॅलीत संजय धोत्रे नसल्याने नागरिक अनुप धोत्रेंवर रोष व्यक्त करीत आहेत.