Yavatmal washim constituency : मतदानाला प्राधान्य द्यावेच लागते. प्रक्रिया सुरू असताना खाणेपिणे गौण ठरते परंतु यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे मतदान सुरू असताना केंद्राध्यक्ष, कर्मचाऱ्यांनी नाश्ता करण्यासाठी मतदान थांबवले. यामुळे मतदारांना मात्र तिष्ठत राहावे लागले.
मतदान सुरू झाले की त्यात सातत्य असते. त्यात खोळंबा होऊ नये, याकडे लक्ष देण्याची जबाबदारी केंद्र प्रमुखांची राहते. मतदान थांबवून अधिकारी, कर्मचाऱ्यांना अन्य काहीही करता येत नाही. नाश्ता, जेवण सुद्धा मतदान न थांबवता करावे, अशा सूचना आहेत. मात्र हिवरी येथील उच्च प्राथमिक शाळा केंद्रावर खोली क्रं 4 मध्ये वेगळे चित्र दिसले. मतदार रांगेत उभे असताना, मतदान कक्षातील चार अधिकारी, कर्मचारी नाश्ता करण्यासाठी खाली एकत्र बसले. शुक्रवारी दुपारी 2 वाजे दरम्यान हा प्रकार घडला. जवळपास वीस मिनिटे मतदान प्रक्रिया बंद होती.
Lok Sabha Election : अमरावतीच्या मतदानाला ईव्हीएमचा तांत्रिक खोडा
आमचे मतदान व्हायचे असताना नाश्ता कसला करता असे म्हणत मतदारांनी ओरड सुरू केली. इतकेच नाही तर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पोटपूजेचा व्हिडिओ, फोटो समाज माध्यमांवर व्हायरल केला. मतदान केंद्रांवरील सुरक्षारक्षकानेही मतदारांनी अरेरावी केल्याची तक्रार आहे.
यवतमाळ येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश देशमुख याबाबत म्हणाले, सर्व अधिकारी, कर्मचारी एकाच वेळी नाश्ता करत असताना अचानक मतदारांची गर्दी झाली. त्यावेळी होमगार्डने त्यांना काही वेळ थांबण्याची सूचना केली. मतदारांची ओरड झाल्यावर कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरू केली. या केंद्रावर आता मतदान सुरळीत सुरू आहे, असे देशमुख यांनी सांगितले. मात्र, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.प्रशासन यासंदर्भात कार्यवाही करणार का हा प्रश्न आहे.