पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात जिथ लागतोय तिथं काहीतरी उलटं सुलट होत असल्याचं म्हणत शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला. ते मुंबईत (1 सप्टेंबर) बोलत होते. ‘सकाळी आम्ही मालवण येथील घटनेचा निषेध केला. अनेकजण उपस्थित होते. अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. 1960 साली यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याकडे पुतळा बसवला. त्याला अजूनही काही झालेलं नाही. पण यांचा पुतळा 6 महिन्यात पडला. त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आलं कोण तर मोदी.. त्यांचा हात जिथ लागतोय तिथं काहीतरी उलटं सुलट होतंय,’ या शब्दांत पवारांनी टीका केली.
पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकर यांची माफी मागण्यात आली नाही. आता विषय काय आहे आणि हे काय बोलत आहेत. आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते? ज्यांनी रयतेचं राज्य आणल त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण पाहिलं, असंही शरद पवार म्हणाले.
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्याने राज्य सरकारवर टीका होत आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा सहा महिन्यांआधी बसवण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. महाराजांचा हा पुतळा कोसळल्याने राज्यभरातील शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पुतळ्यावरून राज्यातील सरकार आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राज्यभरात मविआकडून मालवणमधील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी याच पार्श्वभूमीवर मोदींना चिमटा काढला आहे.
मला माझ्याच बोटांची काळजी वाटते
‘हे राज्य हे रयतेच राज्य आहे हिंदवी स्वराज्य आहे. सैन्य लढायला जरी गेलं तरी शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला हात लावू नका असे आदेश महाराजांनी दिले. अनेक लोक इकडे जुन्नरचे आहेत. तुम्हाला काय महाराजांचा इतिहास सांगायचा. आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. परीक्षेत बसणारी मुलं दहा दिवस संघर्ष करतात. हे राज्यकर्ते तुमच्या हिताचे नाहीत. नरेंद्र मोदी सांगतात की शरद पवार आणि माझे संबंध चांगले आहेत. त्यांनी असंही म्हटलं की मी पवार साहेबांचं बोट धरून आलो आहे. आजकाल जी परिस्थिती आहे त्यातून मला माझ्या बोटाची काळजी वाटतेय,’ असंही शरद पवार म्हणाले.