Dalit Panther Organization : लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार, आरक्षण बंद होणार, असे फेक नरेटिव्ह पसरवून विरोधी पक्षांनी समाजाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला. मात्र जोवर चंद्र सूर्य आहेत, तोवर डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दलित पँथर संघटनेच्या 52वा वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आणण्याचे काम हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नामदेव ढसाळ यांनी केले. मैत्रिचा हा वारसा आपण पुढे नेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले. बाळासाहेब आणि ढसाळ या दोघांचा स्वभाव परखडपणे बोलण्याचा होता. एकदा बोलले की परत मागे घ्यायचे, असा विषय दोघांच्याही डिक्शनरीत नव्हता. आक्रमक
समाजावर प्रभाव
समाजावर प्रभाव टाकणारे नेते अशी दोघांची ओळख होती. नामेदव ढसाळांनी दलित समाजाच्या वेदना, व्यथा त्यांच्या कवितांमधून आक्रमकपणे मांडल्या. त्यांच्या कवितांनी साहित्य जगताचे लक्ष वेधून घेतले होते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, देशाचा कारभार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेवर चालतो. ही राज्यघटना जगातील सर्वोत्तम राज्यघटना म्हणून गणली जाते.
या घटनेत सर्व सामान्य, वंचित, शोषिताला न्याय मिळायला पाहिजे, अशी तरतूद केली आहे. केंद्र सरकारने संविधान दिन 2015 मध्ये सुरु केला. लंडनमधील ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे घर स्मारक केले. इंदु मिलमध्ये जगाला हेवा वाटेल, असे डॉ. बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक राज्य सरकार उभारत आहे. सामाजिक न्याय विभागाकडून दलित समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करतोय, असे मुख्यमंत्री म्हणाले. न मागता काम करणाऱ्या लोकांना सरकार देते, असे ते म्हणाले.
अमेरिकेतील ब्लॅक पँथर या संघटनेला प्रभावित होऊन राज्यात 1972 साली दलित पॅंथरची स्थापना झाली. त्यावेळी राजा ढाले, नामदेव ढसाळ अशा तरुणांनी ही चळवळ उभी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनेचा वाघ आणि तुमचा झेप घेणारा वाघ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या ब्रीदवाक्यातून प्रेरणा घेऊन दलित पँथर काम करत आहे. या चळवळीने दलितांवरील अन्यायाला वाचा फोडून न्याय मागण्याचे काम केले.
दोन वर्षांच्या कालावधीत सरकारच्या कामाची तुलना त्याआधीच्या अडीच वर्षाच्या कामाशी केली तर फरक लक्षात येईल. घरात बसून सरकार चालत नाही. सर्वसामान्यांच्या वेदना समजून घ्यावा लागतात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
Girish Mahajan : गिरीश महाजन साहेब, तुमच्या डोक्यात हवा घुसली !
राज्यातील माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. राज्यातील सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे सरकार काम करेल, आपल्या हक्काचा भाऊ मुख्यमंत्री आहे, असे शिंदे म्हणाले.
सवलतीचा फायदा
महिलांना वर्षभरात तीन सिलिंडर मोफत देणार आहोत. ज्येष्ठांना एसटी सवलत, तीर्थ क्षेत्र दर्शनाची योजना सुरु केली. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले. मुलींचे उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षाला 10 लाख तरुण तरुणींना 10 हजारांचे विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.