Congress News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा व पुण्यातील प्रचारसभेतून काँग्रेस विरोधी रडगाणे गायिले. मोदी यांना प्रचारासाठी सातत्याने महाराष्ट्रात यावे लागते हे भाजपाचा दारूण पराभव होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. महाराष्ट्रातील मोठे उद्योग, गुंतवणूक व रोजगार गुजरातला पळवून नेले त्यावेळी पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्राची आठवण झाली नाही. कांद्यावरील निर्यात बंदी उठवताना महाराष्ट्र आठवला नाही अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली.
महाराष्ट्रातील जनता आता मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असा इशारा देत नाना पटोले यांनी देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानांचा समाचार घेतला. मोदी धादांत खोटे बोलत आहेत, खोटे बोलण्यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. काँग्रेस पक्ष आरक्षण संपवत आहे हा मोदी यांचा आरोप चुकीचा व हास्यास्पद आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर लोकशाही व्यवस्था व संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य, एससी, एसटी, मागासवर्गीयांना हक्क व अधिकारासह आरक्षणही दिले.
संविधान धोक्यात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला व संविधानाने दिलेल्या आरक्षणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाचा पहिल्या पासूनच विरोध आहे. मागील 10 वर्षात धनगर, आदिवासी, मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची घोर फसवणूक करणाऱ्या भाजपावर आता जनता विश्वास ठेवणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाचा घोळ घालून राजकीय प्रतिनिधीत्व मिळण्यापासून या समाजाला वंचित ठेवण्याचे पाप नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस व भाजपाने केले आहे.
400 जागा जिंकल्या की आरक्षण बदलू असे जाहीर सांगणारे मोदींचे खासदार व मंत्रीच आहेत. पण जनता भाजपाला घरी बसवणार याची जाणीव होताच मोदींनी भाषा बदलली. आरक्षणाचे खरे विरोधक भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदी आहेत व संधी मिळाली तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार हे स्पष्ट आहे.
Lok Sabha Election : गरिबांच्या मुलांना डाॅक्टर, इंजिनिअर बनवणार
काँग्रेस पक्षाने दलित नेत्यांचा अपमान केला हे आणखी एक असत्य विधान नरेंद्र मोदी करत आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नवीन संसद भवनाच्या पायाभरणी कार्यक्रमाला मोदी यांनी बोलावले नाही. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला बोलावले नाही. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनालाही बोलावले नाही. कारण त्या आदिवासी समाजाच्या आहेत म्हणून, हा त्यांचा अपमान नाही का. मागील दहा वर्षात देशातील दलित, मागास, अल्पसंख्याक समाजावरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे, हे मोदी विसरले असतील पण जनता विसरली नाही.
भाजपाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांचा सातत्याने अपमान केला. शिवाजी महाराज हे भाजपाला फक्त मतांसाठी हवे आहेत. निवडणुका आल्या की छत्रपतींचे नाव घेता व नंतर त्यांचा अपमान करता हीच भाजपाची निती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 वर्षात सोलापुरात पाचवेळा आले पण 5 लोकांनाही रोजगार देऊ शकले नाहीत. शहराला सात दिवसातून एकदा पाणी येते, हर घर नल, नल में जल ही मोदी यांची योजना सोलापुरात फेल गेली आहे, सोलापुरात नल है पर नल में जल नही, अशी परिस्थिती आहे, असे नाना पटोले म्हणाले.