Bhandara District : शेतकऱ्यांना गावातच कृषीविषयक योजनांची माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी ग्रामविकास समिती स्थापन करण्यात आली. राज्य ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये ग्राम विकास समीतीच्या माध्यमातून ही समिती गठीत करण्यात आली. पण या समितीच्या मार्गदर्शनाचा लाभ किती शेतकऱ्यांना झाला, हा संशोधनाचा विषय असून या समित्या कागदोपत्रीच असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, बहुतांश शेतकऱ्यांना तर ग्रामविकास समिती असते, हे देखील माहीती नसल्याचे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटीमधून निदर्शनास आले आहे.
शेतीचा सर्वांगीण विकास, गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग, शेतकऱ्यांच्या विविध योजना, प्रकल्पामधून हाती घ्यावयाच्या कामांचा प्राध्यान्यक्रम या सर्वांबाबत सुसूत्रता यावी याकरिता ग्रामकृषी विकास समिती स्थापन करण्यात आली होती.
शेतकऱ्यांना गावातच कृषी विषयक योजनांची माहीती व मार्गदर्शन मिळावे, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्य ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रत्येक गावात ग्रामपंचायतींमध्ये ही समिती गठीत झाली होती.
समिती ठरली औपचारिका
भंडारा जिल्ह्यातील 541 ग्रामपंचायतींमध्ये 14 सदस्यीय ग्रामकृषी विकास समिती स्थापन करण्यात आली आहे का? हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे. शासनामार्फत संचालित विविध कृषी विषयक योजना व माहिती या समित्यांमार्फत शेतकऱ्यांना मिळावी, हवामानातील बदल, निसर्गाचा अनियमितपणा, पर्जन्यमान, किडरोग, सुधारित जातींची बियाणे उपलब्ध न होणे आदींवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामकृषी समिती ग्रांमपंचायतीमध्ये स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. विकास समिती प्रत्येक कृषी सहाय्यकाच्या समन्वयाने ग्रामसेवकाने प्रत्येक महिन्यातून किमान एक सभा घेणे आवश्यक आहे. मात्र केवळ औपचारिकता म्हणून या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
राज्यातही सारखीच परिस्थिती
ग्रामपंचायत समिती कृषी समितीबाबत भंडारा जिल्ह्यामध्ये असलेली परिस्थिती पूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती राज्यात इतरही जिल्ह्यामध्येही तशीच आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत कठोर पावले उचलून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यास मदत मिळेल.