Akola District : एकीकडे जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत आहे. आणि दुसरीकडे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होताना दिसत आहे. पाणीटंचाई निवारणाची कामे कागदावरच असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुका संपल्या आतातरी जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर होईल का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक जिल्ह्यात पार पडली. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण प्रशासन गुंतलेलं होतं. जिल्ह्यात आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे अनेक कामांना ब्रेक देण्यात आला आहे. मात्र पाणी टंचाईचे गडद सावट अकोला जिल्ह्यावर घोंगावत आहे. राज्यात अकोला जिल्हा कडक उन्हासाठी प्रसिद्ध आहे. येथे उन्हाळ्यात 40 अंशावर नेहमी तापमान असते. जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्याने जिल्ह्यातील पाणी साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात केवळ 24 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. अनेक ठिकाणी पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर बरेच ठिकाणी नळ योजना, पाणीपुरवठा योजना अद्यापही कागदावरच असल्याने येथील पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. खारपान पट्ट्यातील अनेक गावांत क्षारयुक्त पाणी पिण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.
कृती आराखडा नावालाच
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तीन महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला. जिल्ह्यातील पाणी टंचाईची कामे आतातरी मार्गी लागतील अशी शक्यता होती. मात्र, उपाययोजना कागदावरच आहे. उपाययोजना मध्ये 238 गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या विविध 550 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यातील 149 गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांची 160 कामे आतापर्यंत पूर्ण झाली आहेत. आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांकडून प्राप्त होत असलेल्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता दिली जाते.
त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण, विंधन विहिरी, कूपनलिकांच्या कामांचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित गावांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, प्रस्तावित उपाययोजनांच्या 89 गावांध्ये अद्यापही उपाययोजना झाल्या नसल्याचं समोर आलं आहे.
Prakash Ambedkar : निवडणुकीनंतर ठाकरेंचा ‘हा’ उमेदवार भाजपसोबत जाईल!
पाणीटंचाईचा सामना
त्यामुळे या गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी सुद्धा ग्रामस्थांना दुरून आणावे लागते. निम्मा उन्हाळा उलटला असला तरी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना अद्यापही कागदावरच असल्यानं ग्रामस्थांमध्ये रोष आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तरी पाणीटंचाई च संकट संपेल अशी शक्यता होती. मात्र निराशाच झाली.