देश / विदेश

AAP : दिल्लीतील जलसंकट भाजप पुरस्कृत

BJP : ‘आप’चे आरोप : दिल्ली पाणी पेट घेणार?

Water Issue : दिल्लीत तापमान प्रचंड वाढले आहे. अशा परिस्थितीत सामान्य दिवसांपेक्षा पाण्याची मागणी जास्त असते. काही राज्यांप्रमाणे दिल्लीलाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते, पाण्यासाठी झगडावे लागत आहे. दिल्लीतील पाण्याचे संकट भाजप पुरस्कृत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे दिल्लीतील पाण्याच्या समस्येला राजकीय रंग चढल्याने पाणी प्रश्न पेट घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

‘आप’चे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिल्लीतील पाणी टंचाईसाठी भाजपाला दोष दिले आहे. संजय सिंह यांनी भाजपने दिल्लीतील रहिवाश्यांच्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला. तहानलेल्याला पाणी देण्यापेक्षा मोठे पुण्य नाही आणि पाणी रोखून ठेवण्यापेक्षा मोठे पाप नाही, अशी टीका त्यांनी केली दिल्लीतील हे संकट भाजप पुरस्कृत जलसंकट आहे, असा आरोप त्यांनी केला. दिल्लीतील जनतेला पाणी मिळू नये, अशी भाजपची इच्छा आहे आणि त्यासाठी ते षड्यंत्र रचत आहेत. दिल्लीला हरियाणामधून पाणी मिळते आणि भाजपशासित राज्यात आवश्यक पाणी पुरवले जात नसल्यामुळे पाण्याची टंचाई सुरू आहे, असा गंभीर आरोपही सिंह यांनी केला.

मागणीनुसार दिल्लीला पाणी मिळत नसल्याचा दावा खासदार संजय सिंह यांनी केला. आम्ही हरियाणा सरकारला विनंती केली. पण ते ते ऐकत नाही. आम्ही लेफ्टनंट गव्हर्नरला विनंती करतो, पण ते आवश्यक काम करत नाहीत. दिल्लीतील अनेक भागात काही आठवड्यांपासून पाणीटंचाई आहे. कमी किंवा अत्यल्प पाणी पुरवठा होत असल्याने लोक चिंतेत आहेत. यासाठी ते खासगी टँकरमधून पाणी घेत आहेत.

भाजपचे भांडे फोडो आंदोलन

आम आदमी पार्टीकडून दिल्लीतील पाणी टंचाईसाठी भारतीय जनता पार्टीवर आरोप लावण्यात आले. तर दुसरीकडे भाजपकडून पाण्यासाठी सातत्याने दिल्ली सरकारवर निशाणा साधला जात आहे. आम आदमी पक्षाने निवडणुकीपूर्वी जनतेला 24 तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही असे सांगितले होते. पण ‘आप’ने आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप करीत दक्षिण दिल्लीचे नवनिर्वाचित खासदार रामवीर सिंग बिधुरी यांनी दिल्ली सरकारच्या विरोधात भांडे फोडून निषेध व्यक्त केला. दिल्लीत पाण्याच्या मुद्द्यावरून राजकीय युद्ध सुरू आहे.

दिल्लीच्या जलमंत्र्यांचा हरियाणा सरकारवर आरोप

दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या नेत्या तथा जलमंत्री आतिशी मारलेना यांनी अनेकवेळा दिल्लीतील जनतेसाठी यूपी आणि हरियाणा सरकारकडे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील वीज खंडित होण्यासाठी देखील आतिशी यांनी उत्तर प्रदेश पॉवर स्टेशनच्या अपयशाला जबाबदार ठरविले आहे. सोबतच हरियाणा सरकारवर देखील आरोप केला. जाणीवपूर्वक आणि बेकायदेशीरपणे राजधानीचा पाणीपुरवठा थांबविला जात असल्याचा आरोप आतिशी यांनी केला.

Wayanad : राहुल गांधींचा प्रियंका गांधींसाठी राजीनामा?

हरियाणाची बदनामी थांबवा

आतिशींच्या आरोपांवर योगेंद्र चंदोलिया म्हणाले यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, ‘890 क्युसेक पाणी सोडण्याचा करार हरियाणा सरकार आणि दिल्ली सरकारमध्ये आहे. हरियाणा दिल्लीला सातत्याने 1049 क्युसेक पाणी देत आहे. टँकर माफिया येथून पाणी भरायचे. वीरेंद्र सचदेवा आणि मी याबाबत तक्रार केली होती. 1049 क्युसेक पाणी दिल्लीकरांसाठी वापरण्यात येणार होते. दिल्ली सरकारचे पाच जलशुद्धीकरण केंद्र आहेत. वजिराबाद येथील जलशुद्धीकरण केंद्राची 250 एमजीडी साठविण्याची क्षमता आहे. 2013 मध्ये दिल्ली सरकारने त्यातील गाळ काढण्यासाठी निविदा काढली, असे सांगतानाच चंदोलिया यांनी आतिशी यांनी हरियाणाची बदनामी थांबवावी, असे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!