Political News : विधानपरिषद सदस्य पंकजा मुंडे यांनी आपल्याविरोधात ‘फेक नरेटीव्ह’ सेट केला जात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकाराला संतापून त्यांनी आता संबंधित वाहिन्यांवर अब्रुनुकसानीचा दावा करण्याचा इशारा दिला आहे. ‘माझ्या बाबतीत जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी बातम्या चालविल्या जात आहेत. ओढून ताणून कोणत्याही मुद्द्याला दाखविले जात आहे. असे प्रकार अनेकवेळा घडलेले आहेत. पण आता बस्स झाले. या वाहिन्यांवर अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे,’ असा इशारा पंकजा मुंडे यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
महाराष्ट्रात सध्या आयएएस पूजा खेडकर प्रकरण चर्चेत असून या प्रकरणात दररोज वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. त्या पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीय आहेत, अश्या अतिरंजीत बातम्या चालवून सनसनाटी निर्माण केली जात आहे.
टीआरपीच्या मागे धावताना सार्वजनिक जीवनामध्ये बाधा आणण्याचे काम सुरू आहे. माझ्या यांच्या विधानांना तोडून-मोडून नकारात्मकरित्या दाखविले जात आहे. अनेक विधानांचे विपर्यास करणे, मनाला येईल ते अन्वयार्थ लावणे हे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार माझ्या बाबतीत 2014 पासूनच सुरू आहेत. हे कोणीतरी जाणीवपूर्वक करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
प्रगती खुपतेय का?
पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी पक्षातील काही नेत्यांच्या बाबतीत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांचा लोकसभा निवडणुकतही पराभव झाला. पण, विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. आपली प्रगती काही लोकांना खुपत असल्याची संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
‘मुद्द्यांचं बोलणं सोडून चुकीच्या गोष्टी पसरविण्याकडे वाहिन्यांचा इंटरेस्ट आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात असंच चालणार का?’ असा सवाल त्यांनी केला आहे.