Assembly Election : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असेल, हे निश्चित झालेले नाही. पण माजी आमदार आशीष देशमुख सक्रिय झाले आहेत. या मतदारसंघात परत एकदा महाभारत पहायला मिळण्याची चिन्हे आहेत. युद्धाअगोदरची ठिणगी पडली आहे. काका-पुतण्यामधील वाद परत पेटला आहे. अनिल देशमुख यांनी आशीष यांना ‘भगोडा आमदार’ असे म्हणत डिवचले आहे. पुढील काळात हा संघर्ष शिगेला जाण्याची चिन्हे आहेत.
काका-पुतण्यात सामना
2014 मध्ये काटोलात देशमुख काका-पुतण्यात सामना झाला होता. त्यावेळी आशिष देशमुख विजयी झाले होते. मात्र, आमदारकीची टर्म पूर्ण होण्यापूर्वीच आशिष यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता आशिष देशमुख हे पुन्हा एकदा भाजपकडून काटोल मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. पुन्हा एकदा जुनीच लढत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे.
‘निवडणूक जिंकले तेव्हा तीन वर्षांत काटोलच्या जनतेला सोडून गेले. भगोडा आमदार अशी आशिष देशमुख यांची ओळख आहे. आता पुन्हा अवतरत आहेत,’ अशा शब्दांत अनिल देशमुख यांनी थेट टीका केली. तर ‘मी मतदारसंघात अनेक वर्षे काम केले आहे. पळून गेलो नाही. कोरोनात लोकांची सेवा करण्याचे काम केले. शेतकऱ्यांसाठी धाऊन गेलो,’ असे सलील देशमुख म्हणाले.
यावर आशीष देशमुख यांनी अनिल देशमुखांना चिमटा काढला आहे. काटोलात 2014च्या निकालाची पुनरावृत्ती होईल, याची धास्ती अनिल देशमुख यांना वाटत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. अनिल देशमुख आणि सलील देशमुख या पिता-पुत्रांमध्ये काटोल येथून लढण्यावरून भांडणे सुरू आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांच्यापुढील आव्हाने
2019मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनिल देशमुख यांच्या अत्यंत महत्त्वाचे असे गृहखाते आले. या खात्यात त्यांनी सुरुवातीलाच कारवायांचा धडाका लावला. पण काही कालावधीनंतर 100 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाल्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले. बाहेर पडल्यावर त्यांनी पुन्हा जोमाने काम सुरू केले. पण काटोलमध्ये त्यांच्याविरोधात प्रचार करताना महायुतीच्या उमेदवाराकडे 100 कोटी, तुरुंगाची हवा हे मुद्दे आहेतच.