संपादकीय

Assembly Election : जिंकण्याच्या लढाईत नवनवीन डावपेचांना उधाण

Maharashtra Politics : महायुती, महाविकास आघाडीतील सत्तासंघर्ष जोरात

या लेखात प्रकाशित मते ही लेखकांची आहे. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असे नाही.

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : ‘तदबीर से बिगडी हुई तकदीर बनाले..अपने पे भरोसा है तो दाव लगाले…लगाले दाव लगाले..’ जुन्या काळातील हे गीत खूप गाजले. 1951 या वर्षी निघालेल्या बाजी या चित्रपटातील हे गीत प्रसिद्ध गीतकार आणि शायर साहीर लुधीयानवी यांनी लिहीलं आहे. गीता दत्तने गायलेलं हे गीत अजूनही लोकप्रिय आहे. आपले भाग्य आजमाविण्यासाठी शर्थीने जोखीम स्वीकारून पुढे जाण्याचा अर्थ या ओळीत दडलेला आहे. कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. त्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करावे लागतात. काही प्रसंगी डावही लावावा लागतो. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता हस्तगत करण्यासाठी असेच ‘लगाले दाव लगाले..’चे प्रयोग सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील सत्तासंघर्षाचे प्रयोग विविध सभा, यात्रा मेळावे या माध्यमातून सुरू आहेत.

अजून राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. निवडणूक आयोगाने काही सबबी सांगत दिवाळीपर्यंत निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यामागची काही कारणे सांगण्यात येतात. महायुतीला थोडा वेळ हवा आहे. मतदारांचा कल आजमाविणे सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीने विशेषतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ही निवडणूक खूप मनावर घेतली आहे. आपली खुर्ची हिसकावून घेण्यात आली, याचे शल्य त्यांच्या मनात घर करून आहे. ‘चला जिंकूया..’ असा नारा देत त्यांनी महायुतीविरुद्ध एल्गार पुकारला आहे. एक तर तू राहशील नाही तर मी, इतक्या टोकाच्या भूमिकेपर्यंत ही राजकीय लढाई आली आहे.

मेळाव्यांना जोर

नुकताच महाआघाडीतील घटक पक्षांचा एक मेळावा झाला. एकोप्याने लढा देत महायुतीला पराभूत करण्याचा निर्धार या वेळेस प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केला. ही लढाई स्वतःच्या स्वार्थासाठी नाही महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी आहे, असेही नेत्यांनी सांगितले. महायुतीचे सरकार भ्रष्टाचारी, असंवैधानिक आहे असे आरोपही झालेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर करावे. आपला या नावाला पाठिंबा राहिल, असे उद्धव ठाकरे यांनी घोषित केले. सध्या मुद्दा मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचा नाही. वेळ आल्यावर पक्षश्रेष्ठी नाव घोषित करतील, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. एकजुटीने लढून महायुतीला पराभूत करणे हेच महाविकास आघाडीचे ध्येय असल्याचे सांगितले.

Eknath Shinde : फडणवीसच नव्हे मलाही अडकवायचे होते 

महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत बरेच जण आहेत. यदाकदाचित महायुती सत्तेत आल्यास पुढे याच मुद्द्यावरून गोंधळाची आणि मतभेदाची स्थिती निर्माण होऊ शकते. उद्धव ठाकरे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असे जनमानसावर ठसविण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) वेळोवेळी याच बाबीचा पुनरूच्चार करतात. उद्धव ठाकरे यांचे नाव अग्रक्रमावर तसेच चर्चेत ठेवण्यासाठी ही धडपड सुरू आहे.

लोकसभा निवडणूक (Lok Sabha) निकालानंतर महाविकास आघाडीचे मनोबल वाढले आहे. 156 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवाराने आघाडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा कौल असाच राहिल, असे आघाडीला वाटत आहे. महायुतीला पक्ष फोडाफोडीचा फायदा होण्याऐवजी तोटा झाल्याचे चित्र समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Shrad Pawar) गटाला सहानुभूती सोबत नवसंजीवनी मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे जनसमर्थनही वाढले. कॉंग्रेसची पूर्ण ताकद सोबत असल्याने आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

षण्मुखानंद सभागृहात झालेल्या निर्धार मेळाव्यात महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले. आपली रणनीती आखण्यास सुरूवात केली.

महायुतीवर टीका

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. आपली खुर्ची टिकवण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली आहे, असा आरोपही केला. शिवसेना चोरली, पक्ष चोरला असे हे गद्दार. शिवसेना म्हणून आम्हाला मशाल चिन्ह मिळाले आहे. हिच मशाल महायुतीच्या बुडाला आग लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. निवडणूक आली की धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलली जाते. नरेंद्र मोदींची (Narendra Modi) गॅरंटी संपली आहे. असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संविधानावरचे संकट अजून टळलेले नाही असे नमूद केले. देश आणि महाराष्ट्र वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

संजय राऊत यांनी तर भाजपचे नाते थेट ब्रिटिशांशी जोडले. ब्रिटिशांनी जे केले तेच भाजप करीत आहे. भाजपला सत्तेचा गर्व आहे. विधानसभा निवडणुकीत ही अहंकारी प्रवृत्ती नाहिशी करण्याचे आवाहन त्यांनी केले. उद्धव ठाकरे यांना अचानक कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले. भाजपच्या कट कारस्थानामुळे आपले पद गेले, याची खंत त्यांना अजून वाटते. आता तर ते भाजपसोबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही आपले वैरी मानत आहेत. मनात खदखदत असलेल्या राग ते संधी मिळेल तेव्हा व्यक्त करताना दिसतात.

NCP & Shiv Sena : देशमुख-राऊतांच्या भेटीत नेमके दडलेय काय?

संजय राऊत हेही या कार्यात उद्धव ठाकरे यांची साथ देत आहेत. राजकारणात व्यक्तीव्देशाचा नवा प्रकार रूढ होत आहे. लढण्याचा आणि जिंकण्याचा निर्धार महायुती आणि महाविकास आघाडी कडून व्यक्त होत आहे. प्रत्येक जण नवे डाव टाकून आपली खेळी खेळत आहे. प्रतिस्पर्ध्याचे डावपेच व मनसुबे उधळून टाकण्याची नवी खेळी खेळली जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय नाट्य दिवसागणिक अधिकच रंगतदार होत चालले आहे. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने जनमानसावर आपले नाव कोरण्याचा प्रयत्न करत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!