महाराष्ट्र

Maharashtra Council : मुख्यमंत्री शिंदेंना झोपच येईना!

Eknath Shinde : मध्यरात्रीनंतर आमदारांची हॉटेलमध्ये घेतली भेट

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.१२) मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत कुठलाही दगा फटका होऊ नये यासाठी सर्वच पक्ष सतर्क आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तर झोपच येत नव्हती. ते रात्री 1 वाजता हॉटेल ‘ताज’ मध्ये दाखल झाले. तेथे सगळी चाचपणी करून शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली. त्यानंतर जवळपास तासाभराने ते हॉटेलमधून बाहेर पडले.

शुक्रवारी 12 जुलै रोजी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 11 जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीने नववा उमेदवार दिल्याने ही निवडणूक रंगतदार बनली आहे. या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला दगाफटक्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात सध्याच्या घडीला जोरदार हालचाली घडत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्रभर जागे होते. रात्री 1 वाजता ते ताज लँड हॉटेलमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी आमदारांना मतदानाबाबत मार्गदर्शन केले. या हॉटेलमध्ये दोन दिवसांपासून शिवसेनेच्या सर्व आमदारांचा मुक्काम होता. यामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी या हॉटेलमध्ये एक रूम बुक करण्यात आलेली होती.

अजित पवार गट मतदानासाठी रवाना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ललित हॉटेलमध्ये काल रात्री बैठक पार पडली. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया, यासोबतच मतांचा कोटा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. काही आमदार हे वाहतूक कोंडीत अडकले असल्यामुळे बैठकीला हजर नाहीत, मात्र सकाळी ८ वाजता अजित पवार गट मतदानासाठी एका बसमध्ये निघाला..

उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्टिव्ह

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचीही काल महत्त्वपूर्ण बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री गिरीश महाजन, आमदार अतुल भातखळकर यांच्यासह भाजपचे सर्व महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित होते.

काँग्रेसच्या आमदारांसाठी व्हिप 

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाकडून आपल्या आमदारांसाठी व्हिप बजावण्यात आला आहे. या व्हिपमध्ये सर्वांना मतदान करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच पक्षाने दिलेल्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आदेश या व्हिपमध्ये देण्यात आले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक देखील पार पडली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!