Amravati constituency : अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराने जोर धरला आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रीय पक्षाचे महत्त्वाचे नेते व स्टार प्रचारक सुद्धा अमरावतीत येऊन मतदारांना आवाहन करणार आहेत. मात्र, सध्या ग्रामीण आणि शहरी भागात उमेदवाराच्या इमेजची चर्चा जोरात आहे.
कदाचित मतदार राजा उमेदवाराची इमेज बघून मतदानाचा कौल ठरवेल असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात 37 उमेदवार रिंगणात आहे. प्रथमच भारतीय जनता पक्ष व काँग्रेस पक्षाने आपल्या चिन्हावर उमेदवार दिलेला आहे. तसेच स्थानिक नेते बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनेश बुब तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने आनंदराज आंबेडकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. अनेक लहान मोठ्या पक्षांचे व अपक्ष धरून एकूण 37 उमेदवार या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात मागील पाच वर्षात मतदारांनी अनेक उलथा पालथ अनुभवली. पक्ष पक्षांतर करणारे नेते अनुभवले. बदलणाऱ्या भूमिका सुद्धा अनुभवल्या. याच पार्श्वभूमीवर आता मतदार आपल्या उमेदवाराचा रिव्ह्यू घेत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
निवडणुकीच्या रिंगणात उभा असलेला उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे यापेक्षा तो आपल्या पक्षासोबत किती एकनिष्ठ आहे याची चर्चा सध्या ग्रामीण भागात आहे. या सोबतच त्यांनी आतापर्यंत सर्वसामान्यांचे कोणते प्रश्न जनतेसमोर आणले. त्या प्रश्नांनी सर्वसामान्यांना किती समाधान मिळाले यासह शेतकऱ्याच्या आंदोलनात उमेदवार कितीदा सहभागी झाला व सभागृहात कशा पद्धतीने मुद्दे मांडले अशा अनेक विषयाची चर्चा सुरू आहे. यासोबतच उमेदवाराने आतापर्यंत कितीदा पक्षांतरण केले हेही सुद्धा चर्चेचा विषय ठरला आहे.
ग्रामीण भागातील अनेक तरुण मंडळी सध्या फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब अशा विविध माध्यमांवर जाऊन उमेदवाराची सखोल माहिती घेत असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 37 ही उमेदवारांची कुंडलीच एका प्रकारे 360 अंशात तपासून मतदार राजा आपल्या मतदानाचा कौल देणार असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.