महाराष्ट्र

Lok Sabha Election : मतदान आटोपले,आता प्रतीक्षा आचारसंहिता शिथिल होण्याची 

Bhandara Gondia Constituency : रखडलेल्या विकासकामांकडे नागरिकांचे लागले लक्ष

Bhandara gondia constituency : भंडारा- गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत विकास कामांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे आचारसंहिता केव्हा शिथिल होते याकडे लक्ष लागले आहे.

पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदियासह विदर्भातील पाच मतदारासंघात शुक्रवारी मतदान झाले. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच आचारसंहिता संपण्यासाठी 44 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यास विकास कामे ठप्पच राहणार आहेत. याचा विचार करता मतदान होताच आचारसंहिता अंशतः शिथिल होण्याची प्रतीक्षा पदाधिकारी अधिकाऱ्यांना आहे.

16 मार्चला निवडणूक आचारसंहिता लागली. लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहे. देशातील सर्व भागातील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर मतमोजणी होईल. त्यानंतर आचारसंहिता संपणार असल्याने विकासकामांच्या फाईल मंजुरीचा मार्ग मोकळा होणार आहे. मतदान संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल करता येते. याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. स्थानिक स्तरावरील विकास कामांचा प्रस्ताव मंजूर करणे गरजेचे आहे. याचा राज्यातील वा देशातील अन्य भागातील मतदानावर कोणताही प्रभाव पडणार नसल्यास अशा प्रस्तावाला मंजुरी देता येते. उन्हाचा पारा चढतीवर आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.

मात्र, आचारसंहितेमुळे काम प्रलंबित आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेत शिक्षक भरती झाली. यातील अनेक शिक्षकांची नियुक्ती आचारसंहितेमुळे रखडली आहे. जून महिन्यात शाळांचे नवे सत्र सुरू होते. दरम्यान तत्पुर्वी शिक्षण विभागाद्वारे शाळापूर्व तयारी मोहीम आणि विविध अभियान राबविले जातात. त्यामुळे रिक्तपदे असलेल्या शाळांवर शिक्षकांना रूजू होण्याचे आदेश देणे गरजेचे आहे. आचारसंहितेमुळे अनेक प्रस्तावित योजनांच्या कामांना सध्या ब्रेक लागला आहे.

Lok Sabha Election : सक्करदारा गावाने टाकला मतदानावर बहिष्कार 

विदर्भात 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्यातील मतदान आहे. कदाचित लोकसभा निवडणुकीतील दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आचारसंहितेला शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचे सर्व अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहेत. घोषित केलेली आचारसंहिता संपली, की सर्व प्रकारची कामे विनासायास सुरू होतात, म्हणून सध्या मतदान आटोपताच हा विषय महत्त्वाचा ठरला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!