Political War : पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी (ता. 19) पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरातून निवडणूक लढवीत आहेत. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर मतदारसंघातून रिंगणात आहेत. या दोन दिग्गज नेत्यांसह सर्वच पक्षांची प्रतिष्ठा विदर्भात पणाला लागली आहे.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. पूर्व विदर्भात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश होतो. 2019 मधील निवडणुकीत पाचपैकी चार जागा भाजप-शिवसेना युतीने तर एका जागा काँग्रेसने जिंकली होती. पाचही ठिकाणी थेट लढत होत आहे. पूर्व विदर्भातील प्रचारतोफा आता थंडावल्या आहेत. गुरुवारची रात्र (ता. 18) सर्वच उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवार जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
उपराजधानीत दुहेरी युद्ध
नागपूरमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार व काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्याशी आहे. गडकरी आणि ठाकरे यांच्यामध्ये थेट समोरासमोर सामना होणार आहे. नागपुरात ‘वंचित’ने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मख्यालय असलेली नागपूरची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. मतदारसंघात केलेला विकास हा गडकरींचा प्रचाराचा मुद्दा आहे तर विकास ठाकरे यांनी विकासाचा फायदा नागपूरला काय ? असा सवाल केला आहे.
कोण सर करेल गड?
रामटेक येथे शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे शामकुमार बर्वे यांच्यात थेट लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या मतदारसंघात सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील रामटेकमध्ये तळ ठोकून होते. या मतदारसंघात शिवसेनेत नाराजी आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या गटातील काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले. अशा घटनांमुळे रामटेक मतदारसंघातील निवडणुकीला रंगत आली आहे. राजू पारवे काँग्रेसचे आमदार होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी सेनेत प्रवेश केला.
चांद्याचा खासदार ठरणार
भाजपसाठी नागपूरनंतर सर्वात महत्वाचा मतदारसंघ चंद्रपूर आहे. महाविकास आघाडीने या मतदारसंघातील दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. राज्याचे वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे महायुतीचे उमेदवार आहेत. मुनगंटीवार केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढत आहेत. धानोरकर यांचा मतदारसंघातील जातीय समीकरणावर भर आहे. त्यांनी मतदारसंघात विकासच केलेला नाही. मुनगंटीवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. त्यामुळे येथे सर्वांत चूरसपूर्ण लढत होणार आहे.
धानाचा जिल्हा सज्ज
लोकसभा निवडणुकीसाठी धानाचा जिल्हा म्हणून ओळख असलेला भंडारा गोंदिया सज्ज झाला आहे. भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुनील मुंडे यांना पुन्हा संधी दिली आहे. काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मेंढे विरुद्ध पडोळे लढतीत बहुजन समाज पार्टीचे संजय कुंभलकर व काँग्रेसचे बंडखोर सेवक वाघाये यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. भाजपसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तर काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले व महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
गडचिरोलीचा कोण होणार नेता?
गडचिरोली-चिमूर मतदारसंघावर सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी दावा केला होता. त्यामुळे भाजपला उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला. मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडीचे नामदेव किरसान यांच्यात थेट लढत आहे. नेते तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. काँग्रसने दिलेल्या उमेदवारा विरुद्ध नाराजी व्यक्त करीत पक्षाचे नेते नामदेव उसेंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या मतदारसंघात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगला. आता या पाचही मतदारसंघातून कोणाला कौल मिळतो यासाठी जून महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जून महिन्यात मान्सूनच्या आगमनांसह अनेकांच्या चेहऱ्यावर विजयाच्या आनंदाचे भावपूर्ण आहेत तर काहींच्या नशिबी पराभवाचा पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भातील दिग्गज नेत्यांच्या भवितव्य जरी शुक्रवारी ईव्हीएममध्ये लॉक होत असले तरी कोणाचे भाग्य उघडते याची प्रत्यक्ष सर्वच उमेदवारांना 47 दिवस करावीच लागणार आहे.