First Poll After Removal of 370 : विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या बुधवार, 18 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये मतदान होणार आहे. सात जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. ज्यामध्ये 23.27 लाख मतदारांचा समावेश असेल. आठ जागा जम्मू विभागात आणि 16 जागा काश्मीर खोऱ्यात आहेत. पहिल्या टप्प्यात 219 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 9 महिला आणि 92 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. 110 उमेदवार कोट्यधीश आहेत तर 36 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.
पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा प्रथमच निवडणूक लढवत आहे. मेहबूबा आणि त्यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद हे मुख्यमंत्री होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवण्यात आले. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर येथे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 मधील निवडणुकीत पीडीपीला सर्वाधिक 28 आणि भाजपला 25 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षांनी मिळून सरकार स्थापन केले होते. 2014 मध्ये विधानसभेच्या 87 जागांसाठी शेवटची निवडणूक झाली होती, त्यापैकी 4 जागा लडाखमधील होत्या. केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर विधानसभेच्या 7 जागा वाढल्या. त्यामुळे यावेळी 19 जागांवर निवडणूक होणार आहे.
चोख बंदोबस्त
जम्मू-काश्मीरमधील 90 विधानसभा जागांवर 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल. अनंतनागच्या 7, पुलवामाच्या 4, कुलगाम, किश्तवाड आणि डोडामधील 3-3, शोपियान आणि रामबनच्या 2-2 जागांवर मतदान होणार आहे. डोडा, रामबन आणि किश्तवाड हे जिल्हे जम्मू विभागात येतात तर अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि शोपियान हे काश्मीर विभागात येतात. पुलवामाच्या पंपोर मतदारसंघात सर्वाधिक 14 उमेदवार आहेत. त्याचवेळी अनंतनागच्या बिजबेहारा जागेवर केवळ 3 उमेदवार आहेत.
एकूण पैकी 219 उमेदवारांची सरासरी मालमत्ता 3 कोटी रुपये आहे. 110 उमेदवार कोट्यधीश आहेत. यात पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे (PDP) 21 पैकी 18 उमेदवार कोट्यधीश आहेत. 36 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. 25 उमेदवार आहेत ज्यांच्यावर खून, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. 4 उमेदवारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. 2 जणांवर महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. यातील एका उमेदवारावर बलात्काराचा गुन्हाही दाखल आहे.
हॉटसीटवर लक्ष
जम्मू काश्मिरात बिजबेहरा, कुलगाम, अनंतनाग, पुलवामा या हॉटसीट आहेत. बिजबेहरा ही जागा मेहबूबा मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. दहशतवाद सुरू झाल्यापासून कुलगामला सर्वाधिक फटका बसला आहे. या जागेची विशेष बाब म्हणजे गेल्या 28 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत माकपचे युसूफ तारिगामी विजयी झालेत. काँग्रेसने जम्मू-काश्मीरसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भूमिहीन शेतकऱ्यांना दरवर्षी 4 हजार रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत आणि एका वर्षासाठी बेरोजगार तरुणांना दरमहा 3 हजार 500 रुपये बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा केली आहे.
गरीब कुटुंबांना दिले जाणारे 5 किलो रेशन 11 किलोपर्यंत वाढवण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. सरकारी विभागांमधील एक लाख रिक्त पदे भरण्यासाठी, सरकार स्थापनेच्या 30 दिवसांच्या आत जॉब कॅलेंडर तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा तीन हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Assembly Election : जम्मुत तीन, हरियाणात एकाच टप्प्यात मतदान
भाजपचे वचन
भाजपनेही काही वचनं दिली आहेत. प्रत्येक कुटूंबातील ज्येष्ठ महिलेला प्रतिवर्षी 18 हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रगती शिक्षा योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून दरवर्षी तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना टॅबलेट किंवा लॅपटॉप देण्यात येणार आहेत. जम्मू शहरात आयटीसाठी विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ), श्रीनगरमध्ये मनोरंजन पार्क आणि गुलमर्ग आणि पहलगामचा आधुनिक पर्यटन स्थळे म्हणून विकास हे केंद्रशासित प्रदेशातील आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचे प्रमुख घटक असतील.