महाराष्ट्र

Lok Sabha Election : चंद्रपूरातील मतदारांच्या मनात चाललय काय? विचारपूर्वक घेणार निर्णय

Chandrapur Constituency : केंद्रात मोदी असताना एकदा निवडून दिला होता विरोधातील खासदार

BJP Vs Congress : देशभरात नरेंद्र मोदी नावाची प्रचंड लाट असतानाही विरोधी पक्षातील खासदार निवडून दिल्यानंतरही चंद्रपूरच्या पदरात काय पडले असा विचार आता चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या गंभीरतेने करीत आहेत. 2019 मध्ये चंद्रपुरातील मतदारांनी प्रवाहाच्या विरोधात जात काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी विजयी केले. परंतु विकासाची गंगा मतदारसंघात पोहोचलीच नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार दीर्घ काळापर्यंत सत्तेवर होते. अशात सत्ताधारी आमदार म्हणून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कोणता विकास केला, याचे गणित आता मतदार जुळवित आहेत.

महाराष्ट्रातील काही अत्यंत महत्वाच्या व प्रतिष्ठेच्या लढतींपैकी एक म्हणून चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. नितीन गडकरी यांच्याप्रमाणेच राजकीय वजन आणि उंची असलेले सुधीर मुनगंटीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट ही लढत होणार आहे. त्यामुळे चंद्रपूर, वणी आणि आर्णी या भागातील प्रत्येक गावात हा याच विषयाची चर्चा सुरू आहे की मतदान करायचे कोणाला. देशात कोणाची सत्ता येणार आणि राज्यात कोण खुर्चीवर कायम राहणार हे चित्र जवळपास सर्वच मतदारांना ठाऊक आहे. अशात विरोधी पक्षातील व्यक्तीला निवडून देण्याचे फायदे-तोटे यांच्याबाबत मतदार आता आपआपसात चर्चा करीत आहेत.

Lok Sabha Election : भावनांच्या आधारावर किती दिवस काढणार, काँग्रेस विकासावर काही बोलणार?

बाळू धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसला महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ एकमेवर जागेवर विजय मिळविता आला होता. परंतु या यशाचा कोणताही जलवा काँग्रेस दाखवू शकली नाही. धानोरकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य सक्रिय राजकारणात होते. बाळू धानोरकर हे खासदार होते. त्यांचे बंधू नगरपालिकेच्या राजकारणात आहेत आणि धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या विद्यमान आमदार आहेत. अशात धानोरकर कुटुंब ज्या ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात त्या त्या भागाचा किती विकास झाला, याचा मतदार आता फुटपट्टी लावत हिशोब घेत आहेत. केंद्रात भाजपचे सरकार येणार असेल आणि राज्यात महायुतीचे सरकार कायम राहणार असेल तर विरोधी पक्षातील उमेदवार लोकसभेत पाठवून काय उपयोग होणार? असा प्रश्न मतदारांना पडला आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार की प्रतिभा धानोरकर यासंदर्भात निर्णय घेताना मतदार जपूनच निर्णय घेणार असल्याचे यंदा चित्र दिसत आहे.

भाजपची पूर्ण ताकद

भाजपने देशात यंदा ‘चारसौ पार’चे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आणि देशात ‘इंडिया’ आघाडी विखुरलेली आहे. ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांमध्ये आतापासूनच पंतप्रधान पदासाठी लाथाळ्या सुरू झाल्या आहेत. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, लालु प्रसाद यादव, शरद पवार, राहुल गांधी, अखिलेश यादव यापैकी अनेकांना आतापासूनच पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. देशातील जनतेने 2014 पर्यंत आघाड्यांचे सरकार पाहिले आहे. त्याचे फायदे व तोटेही जनतेने अनुभवले. अशातच 2014 मध्ये प्रथमच देशात बहुमताचे सरकार आले. तेव्हापासून आतापर्यंत बहुमताच्या जोरावर सरकार काय करू शकते याचा प्रत्यही जनतेला आला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही मतदारांना प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विचारपूर्वकच ‘ईव्हीएम’वरील बटण दाबावे लागणार आहे. चंद्रपुरातही सध्या अशीच चर्चा रंगली असून अखेरच्या क्षणी काय होते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!