Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीसाी बुधवार, 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सातपासून मतदानला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी नागरिकांचा कुठे चांगला तर कुठे अल्प प्रतिसाद मिळताना दिसला. संभाजीनगरच्या रामनगर गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. सात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता. गावात पायाभूत सुविधा नसल्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं. अमरावती, लातूर, मेळघाटमधील आदिवासींना सुविधा नसल्यानंही मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला.
मेळघाटमधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार होता. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरामधील आदिवासी समुदायातील नागरिकांनी सुविधा नाहीत. त्यामुळं त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. यामध्ये सहा गावांचा समावेश आहे. रंगुबेली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार ही सहा गावे बहिष्कार टाकणारी आहेत. या परिसरामध्ये 1 हजार 300 मतदार आहेत. मूलभूत सुविधा,पाणी, रस्ते, नाल्या, वीज नसल्याने नागरिक आक्रमक झालेले दिसले.
लातूरमध्ये संताप
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णी गावात ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. गावातील अनेक दिवसांपासून समस्या प्रलंबित आहेत. स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाची माहिती आहे. अनेकदा आंदोलन करूनही प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळं गावकऱ्यांनी बहिष्कारास्त्र उगारलं. गावात 923 मतदार संख्या आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. गावात मतदानच झाले नाही. त्यामुळं मतदानाच्या टक्केवारी व उमेदवारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यामध्ये एका गावामध्ये एकानंही मतदान केलं नाहिी. मतदान सुरू झाल्यापासून हा बहिष्कार दिसून आला. कन्नड तालुक्यामधील रामनगरमध्ये लोकांनी संताप व्यक्त केला. रामनगरवासियांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकल्याचं जाहीर केलं. 1 हजार 466 ग्रामस्थांनी हा बहिष्कार टाकल्यानं प्रशासन व उमेदवार चिंतेत आहेत. स्मशानभूमीच्या प्रलंबित मागणीसाठी गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचं सांगण्यात आलं आहे. गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी अद्याप कोणीही आलेलं नाही. त्यामुळं मतदान न करण्याच्या निर्णयावर गावकरी ठाम आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळातही राज्यातील काही गावांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. त्यानंतरही अनेक प्रश्न मार्गी न लागल्यानं यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा संताप वाढल्याचं दिसलं. मेळघाटमधून माजी खासदार नवनीत राणा यांनाही मोठा फटका बसला होता. मेळघाटमध्ये कामं न केल्यानं अमरावती जिल्ह्यातील आदिवासींचा राणा यांच्यावर संताप होता. त्यामुळे नवनीत राणा यांचा चौफेर पराभव झाला.