Liquor Ban : दारूबंदीच्या मुद्द्यावरून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील निवडणूक गाजत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दारूमाफियांशी संगनमत करून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आल्याचा आरोप काँग्रेसवर होत आहे. दारूबंदी हटल्यानं काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आता निवडणुकीत ‘स्पॉन्सर’ मिळाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे दारूचा महापूर चंद्रपुरात आणण्यावरून सध्या काँग्रेस येथे अडचणीत सापडली आहे. या सर्व परिस्थितीत दारूबंदीला विरोध करणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार नाही, असा निर्धार गडचिरोली जिल्ह्यानं केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातही दारूबंदी आहे. चंद्रपुरातील दारूबंदी महाविकास आघाडी सरकारनं हटविल्यानंतर गडचिरोलीमध्ये भीतीचे वातावरण होते. महायुतीचं सरकार आल्यानंतर या जिल्ह्यातील नागरिकांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर दारूबंदी हटविण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली होती. फडणवीस यांनी ग्वाही दिल्यानंतर या भागातील नागरिकांचे समाधान झाले. गडचिरोलीत गेल्या 31 वर्षांपासून दारूबंदी आहे. ही दारूबंदी हटविण्याची ग्वाही काही नेते दारूमाफियांना देत आहेत.
ठरावच घेतला
जिल्ह्यातील दारूबंदी हटेल अशी भीती असल्यानं गडचिरोलीतील तीनशेवर गावांनी आता एकमतानं ठरावच घेतला आहे. एकूण 309 गावांमध्ये मुक्तिपथ व शक्तिपथ गाव संघटनेच्या नेतृत्वात मतदारांनी ठराव पारीत केला आहे. विधानसभा निवडणुकीत जो उमेदवार दारूबंदीच्या बाजुने असेल त्यालाच मतदान करायचं, असा ठरावच तीनशे गावांमध्ये करण्यात आला आहे. ज्याला दारुबंदी नको, तो उमेदवार असे फलकच या सर्व तीनशे गावांमध्ये लावण्यात आले आहेत. या मोहिमेत महिला मतदार सर्वांत आघाडीवर आहेत. दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडतात. ही विदारक परिस्थिती गडचिरोलीतील अनेकांनी पाहिली आहे. त्यामुळे सुमारे 31 वर्षांपासून कायम असलेली दारूबंदी हटू नये, यासाठी गडचिरोलीतील नागरिक आक्रमक आहेत.
निवडणूक लढविणारा उमेदवाराला या सर्व गावांना लिखित आणि तोंडी वचन द्यावे लागणार आहे. निवडणूक जिंकल्यानंतर आपण दारूबंदी हटविण्यासाठी प्रयत्न करणार नाही, असं उमेदवारांनी लिहून द्यावं लागणार आहे. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जर आमदाराने वचन पाळले नाही तर त्याने लिहून दिलेल्या शपथपत्राच्या आधारे त्याला कोर्टात खेचण्याचीही तयारी या माध्यमातून गावकरी करीत आहेत. त्यामुळं गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे. आपण ग्रामस्थांना शपथपत्र लिहून दिले आणि त्यानंतर दारूबंदी हटविण्यासाठी आपणच प्रयत्न केले तर गडचिरोलीतील लोक आपल्याला कोर्टात खेचतील. इतकेच नव्हे तर पुढच्या वेळला गेल्यावर आदिवासी कोणत्या पद्धतीनं रोष व्यक्त करतील याची भीती सध्या नेत्यांना वाटत आहे.
Chandrashekhar Bawankule : काँग्रेसच्या रक्तात विकासाचा डीएनएच नाही
गडचिरोली जिल्ह्यात एकूण 1 हजार 688 गावे आहेत. त्यात 457 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकूण 12 पंचायत समितींच्या माध्यमातून या गावांचा कारभार चालतो. जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तीनही मतदारसंघ मिळून 950 मतदान केंद्र आहेत. मतदारांची संख्या एकूण 8 लाख 6 हजार 353 आहे. जिल्ह्यात महिला आणि पुरूष मतदारांच्या संख्येत केवळ सात हजारांचा फरक आहे. त्यामुळे महिला मतदारांची संख्या गडचिरोलीत निर्णायक आहे. जवळपास सर्वच महिला मतदारांना गडचिरोलीत दारूबंदी हवी आहे. त्यामुळंच गेल्या 31 वर्षांपासून कायम असलेली दारूबंदी हटेल अशी भीती गडचिरोलीतील महिलांना चंद्रपूरकडे पाहिल्यानंतर वाटत आहे.