राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या प्रकारावर मोठं भाष्य केलं आहे. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावात झालेला हल्ला पूर्वनियोजित कट होता, असा थेट आरोप केला आहे.
विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या गावात लूटमार, नासधूस करण्याची घटना घडणे गंभीर आहे. हा प्रकार पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे झाला आहे. स्थानिकांनाही यामध्ये मारहारण झाली असून हा प्रकार महाराष्ट्राला भूषणावह नाही. हे राज्य सरकारचे अपयश असून या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी साताऱ्यात माध्यमांशी बोलताना केले.
14 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी जमावाकडून विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील घरांची आणि धार्मिक प्रार्थनास्थळांची मोडतोड करण्यात आली. त्याठिकाणी अतिक्रमणाचा कोणताही भाग नव्हता. यानंतर गेल्या तीन दिवसापासून त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप होत आहे.
यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. गजापूरवरचा हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. तिथे जाऊन दंगा, गोंधळ करायचं हे ठरलेलं असावं. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.
विशालगडावरील अतिक्रमण दूर करावं, यासाठी अनेक शिवप्रेमी हे बराच काळ मागणी करत होते. तिथलं अतिक्रमण पावसाळ्याच्या अगोदर दूर करणे गरजेचं होतं. आता ऐन पावसात तिथल्या लोकांना कुठे हलवायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. यावर काही लोकांनी कोर्टातून स्टे आणला होता. त्यामुळे तिथल्या 12-13 घरांना काढणं शक्य नव्हतं, मात्र उरलेल्यांना काढावं असे आदेश आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पावसाळ्यात अशा लोकांना तिथून काढून टाकणं हे योग्य नाही. मात्र अतिक्रमाणाला आमचा पाठिंबा नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.
महाराजांना हे अपेक्षित नव्हतं
विशाळगडावरचं अतिक्रमण दूर झालंच पाहिजे, याबद्दल कोणतीही शंका नाही. अतिक्रमण काढण्यासाठी मुस्लिम वस्तीवर हल्ला करणं. त्यांच्या घरांची नासधूस करणं, तिजोऱ्या फोडणं आणि मालमत्ता लुटणं हे छत्रपती शिवाजी महाराजांना देखील अपेक्षित नव्हतं, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. लोकांच्या घरावर हल्ला करण्याचं काम शिवप्रेमी करू शकत नाहीत. त्यामुळे त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
चौकशी झालीच पाहिजे
काळ सोकावू नये अशी आमची अपेक्षा आहे. पोलीस यामध्ये जनतेला संरक्षण देण्याबाबतीत अपयशी ठरले. फक्त 2 ते 3 पोलीस उघड्या डोळ्यांनी काय होत आहे ते बघत होते. मोठी कुमक लगेच मागवून गुंडांचा हौदास थांबवता आला असता. हा पूर्वनियोजित कट होता, तिथे जाऊन दंगा गोंधळ करायचं हे ठरलेलं असावं. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केलीय.