Vinod Tawde : मी राज्याच्या राजकारणात येणार नाही. सध्या मी दिल्लीतच आहे. माझी भूमिका ही ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र अशीच आहे, असे म्हणत आपण महाराष्ट्रातील राजकारणात परत येणार नाही. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी हे स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस हे सुडाचे राजकारण करत नाहीत. असे असते तर तेच मुख्यमंत्री झाले असते. युती म्हणून आम्ही लढलो. बाळासाहेबांची मते आम्हाला भेटली. पण काहींनी गद्दारी केली. आम्ही विचारांवर युती केली होती, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
तपास यंत्रणांचा दबाव असता तर संजय राऊत हे आतापर्यंत भाजपत आले असते. आतापर्यंत अनेक जणांवर चार्जशीट दाखल झाली आहे. हे सगळे दबावतंत्र असल्याचे बोलले जाते. मात्र ते निरर्थक आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत अनेक प्रकारच्या टीका टिप्पणी होत आहे. यावर तावडे म्हणाले, शरद पवार यांनी सुनेबद्दल बोलणे चुकीचे आहे. हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील प्रचार असू शकत नाही.
फरक स्पष्ट केला
पवारांप्रमाणेच खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या अमरावतीच्या उमेदवाराबद्दल वक्तव्य केले. असे वक्तव्य यापूर्वी कधीही महाराष्ट्राच्या प्रचारात ऐकायला मिळाले नाही. नरेंद्र मोदी असे व्यक्तीगत राजकारण करत नाहीत. भाजपकडून बेरजेचे राजकारण केले जात आहे. यातून विरोधी पक्ष आणि आमच्यात फरक स्पष्ट होतो. पहिल्या दोन टप्प्यात गेल्या वेळी जेवढे मतदान झाले तेवढेच मतदान झाले आहे. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असे वातावरण आहे. विरोधी पक्षाच्या बूथवर बसण्यासाठी कार्यकर्ते नाहीत. निवडणुकीत मत मिळणार नाहीत, या भीतीने काँग्रेसच्या कोणत्याही जाहिरातीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा फोटा वापरलेला नाही. राहुल गांधी यांचा वायनाड मधून पराभव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी आता रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे तावडे म्हणाले.
युतीबद्दल भाष्य
आमची आणि शिवसेनेची विचाराच्या आधारावर युती झालेली होती. नरेंद्र मोदी यांच्या नावावर त्यांना मत मिळाली. उमेदवार निवडून आले होते. पण उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. त्यामुळेच आम्हाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जावे लागले. पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत वैयक्तीक वाद नसल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले. यातून त्यांची उंची लक्षात येते. महिला मतदारांचा भाजपला पाठिंबा आहे. महाराष्ट्रात 40 जागा महायुतीला मिळतील. आमच्याकडे 2047 पर्यंतचे व्हिजन तयार आहे, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.