राजकारणी लोकांसाठी ‘भेल’पूरी ठरलेला भेल प्रकल्प आता मात्र प्रशासनाची डोकेदुखी वाढविणारा ठरणार आहे.’भेल’ कारखाना लवकर सुरू न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसा ‘भेल’चा मुद्दाही पेटणार आहे. भेल कारखाना सुरू करावा, या मागणीसाठी तीन गावांतील – नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
गावकऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. भेल (भारत हेवी इलेक्ट्रीकल लिमिटेड) प्रकल्प सुरू होत नसल्यामुळे गावकऱ्यातर्फे उपोषणकर्त्यांकडून तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी (ता. 23) तहसीलदारांमार्फत देण्यात आले. मुंडीपार येथे 5 जुलैपासून भेल प्रकल्प सुरू करण्यासाठी गावकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. 23 ऑगस्ट रोजी पूर्ण 50 दिवस झाले. परंतु, यादरम्यान फक्त आश्वासन देण्यात आले.
काही राजकीय प्रतिनिधी या उपोषण मंडपाकडे भटकलेही नाहीत. प्रशासन आणि राजकीय स्तरावर या उपोषणालाच बेदखल करण्यात आले. त्यामुळे मुंडीपार, खैरी, बाम्हणी या गावांतील नागरिकांनी 9 सप्टेंबर 2024 पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यासह येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारादेखील निवेदनातून दिला आहे.
जिल्ह्यातील लाखो युवा बेरोजगारांचे स्वप्न असलेली भेल कंपनी रखडल्याने हजारो शिक्षित युवक अन्य मार्गाकडे भटकले आहेत. अनेकांचे वय वाढत असल्याने तणावग्रस्त स्थितीत जीवन जगत आहेत. गंभीर परिस्थिती पाहता प्रशासन व राजकीय मंडळी भेल प्रकल्पाची दखल घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
‘भेल’ने तापवले राजकारण..
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भेल प्रकल्पामुळे भंडारा गोंदियातील राजकारण तापले होते. प्रचारादरम्यान भेल प्रकल्पाची ‘भेलपूरी’ कोणी केली यावर सत्ताधारी आणि विरोधी एकमेकांवरआरोप प्रत्यारोप करताना दिसले. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी ‘भेल’चे प्रकरण उकरून काढले होते.
‘भेल’ प्रकल्प आम्ही आणला. मात्र आम्हाला घरी बसवण्याच्या नादात ‘त्यांना’ जवळ केले. हे लोक भेलची भेलपूरी करून पळून गेले, असा आरोप प्रफुल पटेलांनी नाव न घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केला होता. यावर नाना पटोले यांनीही प्रत्युत्तर देताना ‘भेल’ प्रकल्प कुणी अडवून ठेवला याचा पाढाच वाचला होता, हे सांगण्याची वेळ आणू नका, असा थेट इशारा नाना पटोलेंनी प्रफुल पटेलांना दिला होता.