महाराष्ट्र

Sexual Assault : गावकरी अक्षयच्या घरात घुसले अन्..

Badlapur Case : लोकांनी शिंदे परिवाराला गावातून बाहेर काढले 

Akshay Shinde : बदलापूर येथील शाळेत बालिकांवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेच्या घरावर ग्रामस्थांनी हल्ला केला आहे. बदलापूरमध्ये अक्षय शिंदे राहत असलेल्या खरवई गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेत. अक्षय शिंदे खरवईपासून काही अंतरावर असलेल्या एका चाळीत राहतो. गावातील ग्रामस्थांनी त्याच्या घरात घुसून कुटुंबीयांना बाहेर काढले. जमावाने घरातील सामानाची तोडफोड केली. गावकऱ्यांनी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांना घरातून हाकलून लावत गाव सोडण्यास भाग पाडले.

ग्रामस्थांनी अक्षय शिंदे याच्या घरावर हल्ला चढवला तेव्हा त्याच्या घरात लहान मुलांची खेळणी आढळली. ही खेळणी नेमकी आली कुठून? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. अक्षय शिंदे याचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे. अक्षयचा जन्म खरवई गावात झाला होता. अक्षय याच गावातील एका चाळीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ असे तिघेजण आहेत. त्याच्या नातेवाईकाच्या घरीही तोडफोड करण्यात आली.

दहावीपर्यंत शिक्षण 

अक्षयचे तीन लग्न झाले असून त्याची एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याची माहिती आहे. अक्षय दहावीपर्यंत शिकला आहे. यापूर्वी तो एका इमारतीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. 1 ऑगस्टपासून तो बदलापूरच्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता. त्याने दोन चिमुरड्या मुलींना स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. माझ्या मुलाला या प्रकरणात फसवलं जात असल्याचा दावा अक्षय शिंदेच्या वडिलांनी केला आहे. अक्षयची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करा, अशी मागणी त्यांनी केली.

आमच्या घरातील सर्वांना मारहाण करण्यात आली. जेव्हा आम्ही पोलिस ठाण्यात पोहोचलो तेव्हा अक्षयने काहीतरी केल्याचे आम्हाला सांगण्यात आले, असे शिंदे म्हणाले. महाराष्ट्र सरकारने बदलापूरच्या शाळेवर मोठी कारवाई केली. शालेय शिक्षण विभागाने आता ही शाळा ताब्यात घेऊन प्रशासक नेमला आहे. शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार ठाणे जिल्ह्याच्या प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित यांची प्रशासक म्हणून, तर राजकुमार जतकर आणि विश्वनाथ पाटील यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी निदर्शनानंतर पोलिसांच्या वृत्तीच्या निषेधार्थ विरोधी महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजप-आरएसएसशी संबंधित असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला. शाळेची बदनामी होण्यापासून वाचवण्यासाठी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे, असेही ते म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!