महाराष्ट्र

Nagpur : विकास ठाकरेंनी वाचवले महापालिकेचे पैसे

Vikas Thakre : निविदा प्रक्रियेत केली सुधारणा

Nagpur Municipal Corporation :  नागपूर महापालिका नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात असते. मनपाच्या कार्यप्रणालीवर नेहमीच आक्षेप घेतले जात असतात. कधी अधिकाऱ्यांची मनमानी तर कधी टेंडर मॅनेज करण्याचे प्रकार होत असतात. भ्रष्टाचाराची प्रकरणे देखील समोर येत असतात. असाच एक प्रकार आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या आधारे मांडला. त्याचा निकाल लागलेला आहे. यातून नागपूर महानगरपालिकेची २७५.५ कोटींची बचत झाली आहे.

काय आहे प्रकरण 

नागपूर महापालिका आपल्या नियोजन शून्यता आणि अनियमिततेमुळे दरवर्षी 144 कोटी रुपयांचा तोटा शहर बस सेवेत (आपली बस) करुन घेत आहे. तसेच शहर बस सेवेचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. प्रवासी संख्याही कमी होत चालली आहे. सत्ताधारी पक्षांना 1000 कोटी रुपयांची देणगी ईलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून मेघा इंजिनीअरिंग कंपनीने दिलेली आहे. याच कंपनीची घटक कंपनी असलेल्या एन्वी ट्रान्स प्रा. लि. कंपनीला नागपूर मनपाद्वारे 250 नवीन इलेक्ट्रीक बस खरेदीसाठी 1300 कोटींचा टेंडर देण्याचा निर्णय झाला आहे. अशी माहिती विकास ठाकरे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत मांडली होती .

विकास ठाकरे यांच्या पुढाकारामुळे नागपूर महानगरपालिकेने निविदा प्रक्रियेत सुधारणा केली आहे. त्यामुळे महापालिकेची तब्बल २७५.५ कोटींची बचत झाली आहे. आमदार ठाकरे यांनी निविदा घोटाळा उघड करत नवीन निविदा काढण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती.

Vikas Thakre : नागपूरसाठी निधी येतो तर जातो कुठे?

सर्वाधिक मुद्दे मांडले

विकास ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेत नागपूर जिल्ह्यातील इतर आमदारांच्या तुलनेत सर्वाधिक मुद्दे मांडले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा नागपूर महानगरपालिकेसाठी २५० इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदी आणि संचालनासाठीच्या निविदेबाबत होता. या निविदेच्या प्रक्रियेवर त्यांनी तक्रार केली आणि आंदोलनाचा इशारा दिला. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे अखेर महानगरपालिकेला नवीन निविदा प्रक्रिया राबवावी लागली, ज्याचा लाभ नागपूरकरांना मिळाला आहे. विकास ठाकरे यांनी या यशाचे श्रेय नागपूरच्या जनतेला दिले आहे. त्यांनी नागपूरकरांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचे म्हटले आहे. “नागपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करत राहू,” असे ते म्हणाले.

विकास ठाकरे सध्या नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे नागपूरच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!