महाराष्ट्र

Nagpur constituency : आमचा उमेदवार डावलला तर विरोधात मतदान!

Assembly Election : हलबा समाजाचा थेट इशारा; संपूर्ण विदर्भात दिसतील परिणाम

Central Nagpur : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मध्य नागपूरची उमेदवारी ‘होल्ड’वर ठेवण्यात आली आहे. येथून भाजपकडून प्रवीण दटके उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र या मतदारसंघातील हलबा समाजाची लोकसंख्या लक्षात घेता भाजपकडून वेट-वॉच ची भूमिका घेण्यात आली आहे. दुसरीकडे हलबा समाजाने मतदारसंघात पोस्टरबाजी सुरू केली असून समाजाच्या उमेदवाराला डावलणाऱ्या पक्षाविरोधात संपूर्ण विदर्भात मतदान करण्याचा इशाराच दिला आहे. यामुळे भाजपसमोरील पेच वाढला आहे.

चार हजार मतांनी निवडून आले

हलबा समाजाचे विकास कुंभारे हे मागील तीन टर्मपासून आमदार असून त्यांचा जनतेशी कनेक्ट तुटत असल्याची ओरड भाजपमधूनच होत आहे. मागील वेळी कुंभारे जेमतेम चार हजार मतांनी निवडून आले होते. तर मागील काही महिन्यांपासून विधानपरिषद आमदार प्रवीण दटके हे जोरात कामाला लागले आहे. यंदा उमेदवार बदललाच जाणार अशी पंधरवड्याअगोदर दाट शक्यता होती. मात्र हलबा समाजाच्या भूमिकेमुळे आता भाजपने सावध पवित्रा घेतला आहे.

काँग्रेसकडून बंटी शेळके यांना उमेदवारी जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला हलबा समाजाला नाराज करणे परवडणारे नाही. त्यातच हलबा समाजाने रस्त्यांवर पोस्टर लावत भूमिका मांडल्याने पक्षाची चिंता आणखी वाढली आहे. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी हलबा उमेदवारच द्यावा, असा समाजाचा आग्रह आहे. उमेदवार कोणताही द्या, मात्र तो समाजाचाच असावा, अशी भूमिका जोर धरते आहे.

Vijay Wadettiwar : ये फेवीकॉल का मजबूत जोड है, टुटेगा नही..!

मध्य नागपुरात काही ठिकाणी हलबा क्रांती सेनेतर्फे पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीत हलबा समाजाला उमेदवारी न दिल्यास संपूर्ण विदर्भात हलबा समाज त्या राजकीय पक्षाविरोधात मतदान करेल, अशी भूमिकाच यातून मांडण्यात आली आहे. अशा बॅनरबाजीमुळे राजकीय पक्षांच्या उमेदवारीचा पेच मात्र वाढला आहे.

भाजपसह काँग्रेसही अडचणीत

आतापर्यंत विकास कुंभारे यांच्यासाठी हलबा समाज आग्रही राहू शकतो, असा अंदाज होताच. त्यादृष्टीने विकास कुंभारे यांनी फिल्डिंग देखील लावली होती. पण, आता काँग्रेसलाही हलबा समाजाने अल्टिमेटम दिले आहे. हलबा समाजावर काँग्रेसकडून कायम अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे. यावेळी समाजाला उमेदवारी दिली नाही तर त्याचे परिणाम संपूर्ण विदर्भात दिसतील, असा इशारा देण्यात आला आहे. काँग्रेसकडून हलबा समाजाचे नंदा पराते, रमेश पुणेकर इच्छुक आहेत. त्यामुळे आता केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेसही अडचणीत सापडले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!