Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्यं निर्माण केलं. महाराज या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या वस्तू, त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली ठिकाणं, त्यांनी वापरलेली शस्त्र आपल्यासाठी वंदनीय आहेत. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी महाराजांनी वापरलेली वाघनखं बघता यावी असं स्वप्न प्रत्येक शिवभक्तानं बघितलं होतं. आज ही स्वप्नपूर्ती झाली आहे, अश्या भावना मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केल्या.
खारगे यांनी वाघनखांचा लंडन ते सातारा हा प्रवासही उलगडला. शुक्रवारी (ता. 19) सातारा येथे शस्त्रांच्या कवायतीसह ‛शिवशस्त्रशौर्यगाथा’ हा दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत वाघनखं दर्शनासाठी खुली करण्यात आली. यावेळी शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, शंभुराज देसाई, नरेंद्र पाटील, महेश शिंदे, मकरंद पाटील, मकरंज गोरे, राजेंद्र राव, किशन शर्मा, वृषाली राजे, व्हिक्टोरिया संग्रहालयाचे निकोलस मर्चंट यांचीही उपस्थिती होती. लंडन येथील व्हिक्टोरिया अलबर्ट या संग्रहालयात असलेली वाघनखं सातारा येथे दर्शनासाठी खुली करण्यात आली.
विकास खारगे म्हणाले, ‘वाघनखं भारतात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीमुळे वाघनखं उपलब्ध होऊ शकलीत. व्हिक्टोरिया अलबर्ट म्यूझीयमने आपल्याला संधी दिली.’
चार तासांत प्रक्रिया
परराष्ट्र मंत्रालय, म्यूझीयम, व्हिक्टोरीया यांच्यासोबत करार करण्यात आले. खास विमानाने मर्चंट महाराष्ट्रात आले. ऐतिहासीक वस्तू जेव्हा विमानतळावर येतात, तेव्हा कस्टमची प्रोसेस चार पाच दिवसांची असते. तेथील महिला अधिकाऱ्यांना मी सांगितले, की महाराजांची वाघनखं आहेत. त्यांनी चार दिवस नव्हे, तर चार तासात प्रक्रिया पूर्ण केली. तेथे तपासणी केली नाही. तर साताऱ्याला अधिकारी पाठवले आणि येथे तपासले आणि क्लिअरन्स दिले. सांस्कृतिक संचालक चौरे, उगले व त्यांच्या सहकाऱ्यांनीही मेहनत घेतली, या शब्दांत त्यांनी प्रवास मांडला.
चार शहरांत होणार प्रवास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा प्रवास महाराष्ट्रातील चार शहरांमध्ये होणार आहे. यात सातारा, नागपूर, कोल्हापूर आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी सात ते १२ महिने ही वाघनखं असणार आहेत. महाराजांचा इतिहास आणि त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने गेली वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जात आहेत, याचाही त्यांनी उल्लेख केला.