BJP Politics : भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होऊ शकते. याची खात्री पटल्यामुळे वरिष्ठ स्तरावरून मागील 24 तासात मोठ्या हालचाली झाल्यात. रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट विजयराज शिंदे यांना मोबाईलवर संपर्क करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे. या विषयाला शिंदेंनीही दुजोरा दिला. यावेळी विजयराज यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या औकातवाल्या विधानाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली.
विजयराज शिंदे यांना औकात दाखवून देऊ, असे विधान गुलाबराव पाटील यांनी केल्यामुळे आता आम्हाला औकात दाखवल्याशिवाय पर्याय नाही, असे उत्तर यावेळी विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा विजयराज शिंदे यांनी उभे राहून दाखवावेच, असे आव्हान दिलेले आहे. आपल्या पक्षाच्या दोन्ही नेत्यांनी मला आव्हान दिलेले असल्यामुळे मी अर्ज मागे कसा घेऊ?, असे स्पष्टीकरण विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्री यांना दिले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या नेत्यांची विधाने बेजबाबदारपणाची आणि चुकीची असल्याची कबुली देत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली.
महायुतीच्या जागावाटपात बुलढाण्याची उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही. विद्यमान खासदाराबाबत जिल्ह्यात नाराजी असताना बुलढाण्याची जागा भाजपला घेणे गरजेचे होते. भाजपने गेली तीन वर्षे या मतदारसंघात लोकसभेची तयारी केली आणि शेवटी ही जागा शिंदे गटाला सोडली गेली. शिंदे गटाच्या नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडाचा झेंडा रोवत लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदेंनी दोन नामंकनपत्र भरले होते. एका अर्जात पक्षाचा एबी फॉर्म जोडला न गेल्याने तो बाद झाला तर अपक्ष भरलेला अर्ज पात्र ठरलेला आहे.
विजयराज शिंदे यांनी आपला अर्ज मागे घ्यावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून चिखलीच्या आमदार श्वेता महाले पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे यांनी विजयराज शिंदे यांच्या घरी जात त्यांची समजूत काढली. तेथे शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेली टीका जिव्हारी लागली असल्याने अर्ज मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे आमदार महाले यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून, त्यांना झालेली चर्चा कथन केली. त्यावर बावनकुळे यांनी विजयराज शिंदे यांना नागपुरात पाचारण केले. त्यानुसार रविवारी (ता. 7) दुपारी विजयराज शिंदे, आमदार श्वेता महाले पाटील, गणेश मांटे हे बावनकुळे यांच्या निवासस्थानी पोहोचले.
नागपुरात बैठक
नागपुरातील चर्चेत शिंदे यांनी एकनाथ शिंदे गटाचे मंत्री व आमदार यांनी केलेली टीका व झालेला अपमान सविस्तरपणे विषद केला. अर्ज दाखल करण्याच्या दिवशी, 2 तारखेला माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी, ‘शिंदेंची औकात काय’? असा सवाल केला होता. आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे यांनी निवडणूक लढवूनच दाखवावी, असे आव्हान दिले होते. त्यामुळे लढण्याचा निर्धार करून प्रचार सुरू केला, असे विजयराज शिंदेंनी वरिष्ठांना सांगितले.
भाजपची ताकद
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असून, तीन आमदार आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्यावी, अशी विनंती देखील शिंदेंनी बावनकुळे यांच्याकडे केली. मात्र बावनकुळे यांनी ‘युतीधर्म’ महत्वाचा असून, ‘तुमच्या ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत त्यांना समज देऊ’, असा शब्द दिला. आपण भरलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. युतीधर्माचे पालन करून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा, अशा सूचना बावनकुळे यांनी विजयराज शिंदेंना याप्रसंगी दिल्यात. त्यावर विजयराज शिंदेंनी अर्ज मागे घेण्याचा ठोस शब्द न देता, ‘कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतो’, असे सांगितल्यानंतर चाणाक्ष बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून, सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला.
बैठकीनंतर विजयराज शिंदे यांची आक्रमकता जवळपास कमी झाली असून ते आपला अर्ज मागे घेतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. बुलढाण्यातील विजयराज शिंदे व हिंगोलीतील श्याम भारती महाराज व इतरांनी केलेली बंडखोरी शमविण्याची जबाबदारी फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपावलेली आहे. त्यादृष्टीने हिंगोलीला जाण्यापूर्वी महाजन हे आज सकाळी बुलढाण्यात आले होते. परंतु तोपर्यंत विजयराज शिंदे व श्वेता महाले, गणेश मांटे हे नागपूरकडे रवाना झालेले होते.
समजूत काढण्याचा प्रयत्न
भाजपचे बुलढाणा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांची समजूत काढण्यासाठी चिखलीच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मांटे देखील हजर होते. शिंदे यांना घेऊन श्वेता महाले या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूरला जाणार आहेत. त्यामुळे शिंदे यांचे बंड थंड होण्याची दाट शक्यता आहे. असे झाले नाही तर विजयराज शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही एव्हडे मात्र निश्चित.