Political War : बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी चक्क आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुवत असताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडीओ फेसबुकवरुन पोस्ट केला. संजय गायकवाड हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात त्यांचं कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेरच हा प्रकार घडल्याचा दावा सपकाळ यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी व्हिडियो पोस्ट करत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना मस्ती आल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांचं काम लोकांची सुरक्षा करणं आहे की आमदरांच्या गाड्या धुणं? असा सवाल माजी आमदार सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही हाच व्हिडीओ पोस्ट करत शिंदे गटातील आमदारांना मस्ती आल्याचा आरोप केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. पोलिसांना तुम्ही घरगड्यासारखं वागवत आहात. हा सत्तेचा माज आहे या आशयाची पोस्ट विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत एकटा पोलीस कर्मचारी गाडी धुताना दिसतोय. रस्त्यावर उभी असलेली आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याच्या अंगावर खाकी आहे. म्हणजेच कर्तव्यावर असताना तो हे काम करत होता. हा व्हिडीओ पोस्ट करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आयाबहिणींच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी? अशी विचारणा केली आहे. तसंच पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
वडेट्टीवारांचं ट्वीट
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही हा व्हिडियो शेअर केला आहे. ‘शिंदे गटातील आमदारांना सत्तेची आलेली मस्ती बघा… खाकीतील पोलिसांना घर गडी म्हणून वागवताहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात खाकीतील पोलिसांबद्दल विशेष आदर असतो, त्यांचा धाक असतो. पण महायुती सरकारच्या काळात भाजप-शिंदे गटाचे आमदार-खासदार खाकीचा रोज कसा अपमान करतात हे महाराष्ट्र बघतोय. राणे आणि संजय गायकवाड… महाराष्ट्र पोलीस मुकाटपणे का हे सगळं सहन करून घेत आहेत? महायुतीतील आमदार खासदारांना खुश ठेवण्यासाठी गृहमंत्री-मुख्यमंत्र्यांचं दडपण पोलीस खात्यावर आहे का?’ अशी पोस्ट विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
गायकवाडांना वाय दर्जाची सुरक्षा
बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात आमदार संजय गायकवाड यांचे संपर्क कार्यालय आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यासह शिंदेच्या ४० आमदारांना व खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. ती सुरक्षा अद्यापही कायम आहे. दरम्यान आमदार गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस त्यांचे वाहन धुवत असल्याचा एक व्हिडिओ अज्ञात व्यक्तीने शूट केला. आणि पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट केला आहे.