Congress Vs BJP : एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीमाहीत विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. विदेशी गुंतवणुक सातत्याने वाढत आहे, असं ट्विट फडणविसांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. राज्याला नंबर वन म्हणणं ही केवळ कागदी आकडेमोड असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
फडणवीस यांचे ट्विट
तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याचा निर्धार पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे. तर या प्रवासात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक असावा यासाठी आपला प्रयत्न असल्याचे महायुती सरकार म्हणत आहे. महाराष्ट्रामध्ये विदेशी गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. हा देश प्रगतीपथावर असताना महाराष्ट्राचे योगदानही मोलाचे राहील, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत असं फडणवीस म्हणतात. याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले. एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीमाहीमध्ये महाराष्ट्राने विदेशी गुंतवणुकीत पहिले स्थान कायम राखले असल्याचे त्यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एका ट्विटद्वारे राज्यात आलेल्या विदेशी गुंतवणुकीची माहिती दिली. त्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये महाराष्ट्राने 70795 कोटी रुपयांची गुंतवणूक खेचून आणली. आणि देशात पहिले स्थान कायम राखले आहे, असं म्हटले. परंतु यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुजरातला गेलेल्या उद्योगांचं काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
फडणवीस यांनी स्पष्ट सांगावे
‘फडणवीस यांनी विदेशी गुंतवणुकीबाबत केलेली आकडेमोड ही केवळ कागदावरच आहे. महाराष्ट्राला केवळ कागदावरच पहिल्या क्रमांकावर दाखवले जात आहे,’ असा सनसनाटी आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या गुंतवणुकीबाबत शंका व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात आलेली थेट विदेशी गुंतवणूक आहे की नुसतेच सामंजस्य करार आहेत, हे स्पष्ट करावे असे आवाहन सरकारला केले आहे. ही गुंतवणूक असेल तर राज्यात नेमकी कुठे झाली आणि यातून किती रोजगार निर्माण झाला, हेही सरकारने सांगावे, असे सुप्रिया म्हणाल्या.
72 टक्के महाराष्ट्राचा वाटा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदेशी गुंतवणुकीबाबत माहिती दिली. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही मध्ये एप्रिल ते जून या कालावधीत संपूर्ण देशात 134959 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यापैकी 70795 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. एकूण विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 52 टक्के आहे, असं फडणविसांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राने विदेशी गुंतवणुकीमध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे. या गुंतवणुकीमध्ये मॉरिशस कडून 25 तर सिंगापूर कडून 24 टक्के गुंतवणूक झाली आहे, असेही फडणवीस यांनी जाहीर केले.
अशी झाली गुंतवणुक
कर्नाटक 19059 कोटी रुपये
दिल्ली 10778 कोटी रुपये
तेलंगणा 9023 कोटी रुपये
गुजरात 8508 कोटी रुपये
तामिळनाडू 8325 कोटी रुपये
हरियाणा 5818 कोटी रुपये
उत्तर प्रदेश 370 कोटी रुपये
राजस्थान 311 कोटी रुपये