Maharashtra Politics : तिकडे जाऊन महादेव जानकर स्वतःच पराभूत होत आहे. कदाचित त्यांची स्टेप चुकली. ते जर आमच्यासोबत असते, तर खासदार झालेले दिसले असते. दुर्दैवाने त्यांचं पाऊल चुकलं आणि पाऊल चुकल्यानंतर जे बोलावं लागतं, तसं जानकर सध्या बोलताना दिसतात. पण त्यांना जी सीट दिली त्यामुळे ते खाल्ल्या मिठाला जागणार, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार आज (ता. १) नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजप नेत्यांच्या दाव्यांमध्ये काही तथ्य नाही, इंडिया आघाडी जिंकणार आहे. इंडिया आघाडीची मोट बांधून आम्ही लढलो. इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार आणि तो पंतप्रधान कोण व्हावा, तर माझा नेता व्हावा राहुल गांधी व्हावा, असं मला वाटतं. इंडिया आघाडीत जी काही चर्चा होईल. त्या चर्चेमध्ये जे नाव पुढे येईल तो इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल.
निकालानंतर कळेल की, कोणी कोणाला मदत केली आहे. महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ होईल. यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सुद्धा आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी राणेंवरही हल्ला चढवला. हे रिपोर्ट्स आहेत. कितीही पैसे लावले असले तरी भाजप निवडून येणार नाही. भाजपच्या नेत्यांच्या बोलण्यत तथ्य नाही. महाराष्ट्रात भाजपपेक्षा जास्त जागा इंडिया आघाडीला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Nana Patole : एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट राहिल का? पटोलेंना शंका !
सुनील तटकरे यांच्याबद्दल विचारले असता, त्यांनाच विचारा की, पराभवानंतर ते कुठे जाणार आहेत? मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. याबाबत विचारले असता, कुणी किती जागा लढवाव्यात, तो त्यांचा अधिकार आहे. जनता ठरवेल कुणाला कितपत साथ द्यायची. तो येणारा काळ ठरवेल. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये जे काही राजकीय पक्ष काम करत आहेत. त्यापेक्षा नवीन पक्ष काढून जर ते लढत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
आजच्या बैठकीत काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते येणार आहेत. दुष्काळासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात किती मोठा दुष्काळ आहे, परिस्थिती किती भयावह आहे, हे सरकारच्या लक्षात आणून द्यायचे आहे. 4 जून नंतर
इंडिया आघाडीचाच पंतप्रधान होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. भाजप सत्तेतून बाहेर गेलेला दिसेल, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.