विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवार विजयी झाले. यामध्ये भाजपच्या 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवाराचा विजय झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. काँग्रेसची 7 मते फुटली. विधान परिषदेच्या निवडणुकीचे निकाल आले, त्यात संख्या बळ पाहता तिसऱ्या जागेसाठी चूरस होती. छोट्या पक्षांना सोबत घेऊन आम्ही बातचीत करून निवडणुकीला सामोरे गेलो. काही लोकांवर आम्हाला शंका असल्यामुळे आम्ही तिसरी जागा लढविली. आमदार पक्षाच्या चिन्हावर येऊन गडबड करत असल्याचे लक्षात आलं. मागील वेळी सुद्धा विश्वासघात झाला होता. यावेळी एका विशिष्ट पद्धतीने यात काही लोक आयडेंटिफाय झालेले आहेत. यात प्रदेशाध्यक्ष यांनी गद्दारांना हकलण्याचा निर्णय घेतला, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
लक्ष लागून होते
बाबा सिद्दीकी यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. स्वतः एक्सवर पोस्ट करून कॉंग्रेस सोडत असल्याचं जाहीर केलं होत. बाबा सिद्दिकी गेलेले आहेत, सर्वांना माहिती आहे. नांदेडचे दोन लोक हे अशोक चव्हाण यांच्यासोबत होते. व्हीप टाकून सुद्धा वोटिंग मध्ये आमच्यासोबत गद्दारी झाली. काही लोक गडबड करत असल्याने त्यावर आमचं लक्ष होतं. सुलभा खोडके यांच्यावरही लक्ष होते. काँग्रेसची मते फुटल्याची कबुली प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिली. फुटलेल्या आमदारांची नावे प्रदेश काँग्रेसने दिल्लीलाही पाठविली आहेत. त्यामुळे आमदार सुलभा खोडके यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे वडेट्टीवार म्हणाले.
भुजबळ यांची नार्कोटेस्ट करा
मुख्यमंत्री मराठा समाजाला गुलाल उधळायला लाऊन दिशाभूल करतात. त्यातून आपली पोळी शेकण्याच काम करत असताना पितळ उघड पडलं आहे. सत्ताधाऱ्यांनीच मराठा व्हर्सेस ओबीसी वाद सुरू केला. छगन भुजबळ खोटं बोलत असल्याचा दावाही त्यांनी केला. उपोषण स्थगित करायला लावलं आणि काहीच करू शकत नाही. मराठा आणि ओबीसींना काय आश्वासन दिले, हे अधिवेशनात मांडा असे आम्ही म्हणालो होतो. पण सत्ताधाऱ्यांनी मांडले नाही. सत्ताधाऱ्यांनी आम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता ते स्वतः ट्रॅप झाले आहेत. सरकारने दोन्ही समाजाची फसगत केल्याचं सिद्ध झालं आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
भुजबळांची नार्कोटस्ट केली पाहिजे. कोणाचं नाव घेऊन कोणालाही बदनाम करण्याचं काम भुजबळ करत आहेत. दोन समाजात वाद निर्माण होऊन उभे ठाकले आहे. तलवार काढून कोणाच्या अंगावर धावून जाण्याचा आणि कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
देव भाजपावर कोपला
पोट निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झाला. इंडिया आघाडीला मोठे यश प्राप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीत 234 जागा जिंकणाऱ्या विरोधी भारत आघाडीने 13 जिल्ह्यांच्या पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे. ज्या 7 राज्यांमध्ये 13 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली, त्यात इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांच्या उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. बद्रीनाथ येथे सत्ता असताना एक जागा तिथली भाजप हरली आहे. देव सुद्धा भाजपवर कोपलेला आहे. जिथे राम आहे तिथे यांचे काम तमाम झालेले आहे. रामाच्या नावावर फसवण्याच काम भाजपने केले आहे. आता जय श्रीराम म्हणणे कमी झाल आहे. दुसरा काहीतरी नवीन काढतील, जय जगन्नाथ मंदिर नाव घेतील, अशा शब्दात वडेट्टीवर यांनी भाजपवर टीका केली.
चौकशी करून न्याय द्यावा
मुख्यमंत्री एमएसपी साठी जाऊन बसले होते. आता बाजरीला सात टक्के दर आहेत. एक वर्षात कीटकनाशक आणि शेती अवजारावर टॅक्स, बियाण्याचे दर वाढल्याने शेतकरी उद्धवस्त झाला आहे, असे असताना पाच टक्के एमएसपी वाढवून गळा घोटण्याच काम केलं आहे. पूजा खेडकर यांनी भाजप नेत्याला चेकने देणगीचे पैसे दिले आहेत. प्रकरण गंभीर झाले आहे फायदा झाला म्हणून पैसे दिले, यात तथ्य काय? याची चौकशी करून न्याय द्यावा. नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.