Reservation Issue : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी जात निहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. देशात जात निहाय जनगणना करण्याची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केली होती. काँग्रेसने याच मुद्द्यावर लोकसभा निवडणुकीत व्यापक प्रचार केला. ‘जिसकी जितनी भागिदारी, उसकी उतनी हिस्सेदारी’ असे काँग्रेसने म्हटले होते. आता याच विषयावर ओबीसी नेते वडेट्टीवार सक्रिय झाले आहेत.
निवडणुकीनंतर जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरत आहे. काँग्रेस या मुद्द्यावर ‘फ्रंटफूट’वर आली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत देशात यश मिळाल्यानंतर काँग्रेसचे यासंदर्भातील मनोबल वाढले आहे. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिले आहे. विविध समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकारने संवेदनशीलपणे सोडवायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.
अनेकांना हवे आरक्षण
राज्यात मराठा, ओबीसी, धनगर, मुस्लिम, आदिवासी समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. या आरक्षणासाठी आंदोलन होत आहे. मराठा, इतर मागास (ओबीसी), धनगर, आदिवासी, मुस्लिम, लिंगायत, अशा सर्व समाजाला महायुती सरकारने आरक्षणाची खोटी आश्वासन दिले. केवळ मतावर डोळा ठेवून महायुती सरकारने या सर्व समाजाची फसवणूक केली, असे वडेट्टीवार म्हणाले. जातीच्या मुद्द्यावर राज्यात अशांतता आहे. अनेक समाज केवळ महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकमेकांविरोधात उभे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
राज्यात अलीकडेच पुन्हा मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे. अशा आंदोलनांमुळे मराठा विरूद्ध ओबीसी, धनगर विरूद्ध आदिवासी असा संघर्ष राज्य सरकारने जाणीवपूर्वक उभा केला आहे. आरक्षणाबाबत दिलेले आश्वासन पाळणे सरकारला शक्य नाही. त्यामुळे आज राज्यात परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. सरकारविरोधात तीव्र नाराजी आहे. मराठा समाजाचीही फसवणूक झाली आहे. काही गावांमध्ये दोन्ही समाजाने एकमेकांशी व्यवहार देखील बंद केले आहेत, असा संताप वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
हक्काला संरक्षण मिळेल
परिस्थिती पाहता जातनिहाय जनगणना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय सर्व समाजांच्या हक्कांचे संरक्षण होणार नाही. राज्य सरकारने यासाठी जबाबदारीने पावले उचलली पाहिजे. राज्य सरकारने महाराष्ट्रात तात्काळ जात निहाय जनगणना सुरू करावी. यातून सर्वच समाजाला समान न्याय द्यावा, केंद्राकडे पाठपुरावा करावा. असे न झाल्यास फसव्या कारभारामुळे राज्यातील सलोख्याचे वातावरण दूषित होऊ शकते, अशी भीतीही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.