महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : लोकसभा निवडणुकीत जनतेने ‘यांची’ जिरवली !

Maharashtra Government : राज्याला ड्रग्जचा विळखा, परिस्थिती गंभीर.

महागाई, बेरोजगारी, घोटाळे, टेंडरबाजीमुळे महायुती सरकारच्या काळात राज्याची अधोगती झाली. फसव्या घोषणांसाठी राज्याला कर्जबाजारी केलं आहे. केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी योजना राबवून सरकारी तिजोरी साफ केली जात आहे. राज्यातील आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक हे सरकार सोडवत नाही. त्यामुळे महायुती सरकारची महाजातीयवादी सरकार अशी ओळख निर्माण झाली असल्याचा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. 

शुक्रवारी (ता. 12) अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यांनी सरकारवर सडकून टिका केली. वडेट्टीवार म्हणाले की, मराठा आरक्षण मुद्यावरून सरकारने भूमीका स्पष्ट केली नाही. राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीला सरकारने विश्वासात घेतले नाही. जनतेला विश्वासात घेतले नाही. अधिवेशन सुरू असताना सभागृहात कोणतीही भूमिका मांडली नाही.

सरकारकडे बहुमत असल्याने मराठा समाजाचे प्रश्न या सरकारने सोडविले पाहिजेत. मराठा –ओबीसी समाजांत सरकारने तेढ निर्माण करू नये. या दोन्ही समाजांचे सरकारने समाधान करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याचबरोबर सरकारने जातीनिहाय जनगणना का केली नाही, असा सवाल करत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.

श्वेतपत्रिका काढली पाहिजे

राज्यातील उद्योगधंदे भाजपशासित राज्यांतच का जातात, असा परखड सवाल करत वडेट्टीवार यांनी राज्यातील बेरोजगारीला सरकार जबाबदार असल्याचा पुनरूच्चार केला. बेरोजगारीमुळे युवकांच्या आत्महत्या होत आहेत. 4 हजार तलाठी पदासाठी 18 लाख अर्ज येतात. यावरून बेरोजगारीचे भीषण वास्तव स्पष्ट होते. दाओसच्या करारामुळे किती उद्योग निर्माण झाले? रोजगार निर्मिती किती झाली, हे राज्याला माहिती झाले पाहिजे. दाओसचा करार हा एक जुमलाच होता, हे आता लपून राहिलेले नाही. सरकारने दाओसची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम महायुती सरकार करू शकले नाही. पुरोगामी राज्यात मनुस्मृतीचा चंचू प्रवेश होत आहे. समूह शाळांच्या नावाखाली शाळा बंद करण्याच सरकारचा डाव आहे. मुलींना पारिंपरिक शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या वर्मावर घाव घातला.

‘आनंदाचा शिधा’ योजना फक्त कंत्राटदाराचे पोट भरण्यासाठी काढली आहे. राज्याला ड्रग्जचा विळखा असून परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे सरकारने तरूणाई वाचविण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. कर्ज काढून सण साजरा करणारं हे सरकार आहे. कर्ज काढून घर बांधणे आम्ही समजू शकतो. पण घरातली माणसं उपाशी ठेवून घर सजिवणे, हा सरकारचा अतिरेक आहे.

Akola News : अखेर सत्ताधाऱ्यांनीच दिला सीईओ कार्यालयात ठिय्या!

जनतेने सरकारची लोकसभेत जिरवली. त्यामुळे सरकारने काही फसव्या योजना आणून जुमला केला आहे. धुळे, बीड, मुंबई, नागपूर येथील लोकसभा निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप झाला. यामध्ये काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या भूमीत भाजपाचा पराभव झाला. प्रभू श्रीरामचंद्राच्या नावाने तुम्ही मतं मागता म्हणून पवनपुत्र हनुमानाने लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पाठीवर गदा मारलीस असा चिमटादेखील वडेट्टीवार यांनी काढला.

मनी नाही भाव, म्हणे देवा ! मला पाव । देव अशानं भेटायचा नाही रे !

देव बाजारचा भाजीपाला नाही रे !

या ओळी वडेट्टीवार यांनी ऐकवत सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!