Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र रोष व्यक्त होत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सिंधुदुर्ग येथे जात पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली. लोकसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागण्यासाठी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभारला. महायुतीच्या टक्केवारीच्या धोरणामुळे या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळेच केवळ आठ महिन्यात पुतळा कोसळला. या घटनेमुळे सर्वांची मान शरमेने खाली गेली. महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले.
सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या मोर्चाला संबोधित करताना वडेट्टीवार बोलत होते. पंडित नेहरूंच्या हस्ते अनावरण झालेले पुतळे आजही भक्कम स्थितीत आहेत. पुतळा उभारणारा जयदीप आपटे 24 वर्षांचा आहे. त्याला अनुभव नसताना पुतळा करायला दिला. आता तो फरार आहे. वाऱ्याने या परिसरात एक नारळ पडत नाही. ताडपत्री उडत नाही. पुतळा कसा पडला हा प्रश्न आहे. आता मुख्यमंत्री वाऱ्याच्या वेगाचे कारण देत आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.
सरकारची चमकोगिरी
महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. एक वीटही अजून रचली नाही. फक्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून मतांसाठी इव्हेंट केला. आम्ही किल्ल्यावर पाहणी करायला गेलो. त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी गुंडगिरी केली. ही सरकारची झुंडशाही आहे. ही झुंडशाही आता जनता खपवून घेणार नाही, असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला.
पुतळ्याच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरे यांच्या घरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही झाली. बैठकीनंतर शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. येत्या रविवारी महाविकास आघाडी या मुद्द्यावर रस्त्यावर उतरेन, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. वाऱ्याने पुतळा पडला हे कारण निर्लज्जपणाचा कळस गाठणारे आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन भगतसिंह कोश्यारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता. गेटवेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तो पुतळा मजबुतीने उभा आहे. या पुतळ्याजवळ सरकारला जोडे मारो आंदोलन करू. सर्व शिवप्रेमींनी आंदोलनात यावे, असे ठाकरे यावेळी म्हणाले.