हमीभाव नाही, शेतमाल खरेदी करायचा नाही, 1 रुपयांत पिक विमा कागदावरच आहे. संपूर्ण कर्ज माफी, वीज बिल माफ महायुतीच्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, या शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (ता.12 ). विरोधी सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला. विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ते नागपुरात बोलत होते.
महाराष्ट्रात जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतशी जुमलेबाजी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्यांना आश्वासन देतात. शेत पिकाला दुप्पट भाव देऊ असं सांगतात. खरंतर त्यांनी त्यांच्या सरकारच्या प्रतिनिधींकडून माहिती घ्यायला पाहिजे होती. नंतरच या सर्व विषयाकडे लक्ष द्यायला हवे होते. महाराष्ट्रातील शेतकरी रडत आहे. त्यांना 4000 रुपयांच्या पलीकडे सोयाबीन पिकाला दर मिळत नाही. अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. तरी हे सरकार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आनंदी आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १.७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानाचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका पिकांना बसत आहे. पिकांना संरक्षण मिळावे या उद्देशाने राज्य शासनाने पीकविमा योजना सुरू केली. त्यात गेली दोन वर्षांपासून राज्य शासनाने केवळ एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली. ही शेतकऱ्याची थट्टाच आहे. त्याच्या जीवाशी महायुती सरकार खेळ करत आहे, असं ते म्हणाले.
हा काय प्रकार आहे?
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मित्रांसोबत सरकारने थट्टाच केली. विमा कंपनीने पिकाच्या नुकसानभरपाईची रक्कम जाहीर केल्याचे समोरच्या माणसाने कळविले. यादी पाहण्यासाठी गेलो. तीन लाखांवर नुकसान झाले असताना नावापुढे तीन रुपयाचा आकडा दिसला. महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे 12 लाख हेक्टरच नुकसान झालं. शेतकऱ्यां मदत मिळाली नाही. कोरडा दुष्काळ होता तेव्हा मदत मिळाली नाही. डीबीटीच्या माध्यमातून रक्कम मिळाली नाही. सरकार काय करत आहे? फक्त तिजोऱ्या फोडायचे काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
सरकारची ही उत्तम कामगिरी आहे. रामन राठोड यांच्या सोबत ही घटना घडली आहे. त्यांना भेटण्यासाठी मी यवतमाळ जिल्ह्यातील यावली गावत जाणार आहे. तीन रुपये द्यायला सरकारला लाज वाटली नाही का? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हाल या लोकांनी करून ठेवले आहेत, अशी टीका त्यांनी केली. डीबीटीच्या माध्यमातून जी आकडेवारी जाहीर करण्यात आली ती चुकीची आहे, असं वडेट्टीवर म्हणाले.
vijayadashami : सरसंघचालक म्हणाले, ‘ओटीटी यावे कायद्याच्या चौकटीत’
तो जीआर खोटा!
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 80 जीआर काढण्यात आले. यामध्ये अनेक जीआर असे आहे की ज्यामध्ये एक रुपयाची सुद्धा तरतूद नाही. तरीसुद्धा मान्यता देण्यात आली. निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा जीआर अगोदरच तयार करण्यात आला आणि नंतर मंत्रिमंडळात सादर करण्यात आला, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
निवडणूक म्हणून जातीय भाषण
बांगलादेशातील हिंसाचार आणि हिंदूंवरील अत्याचाराचा विषय सरसंघचालकांनी निवडणुका पाहून काढला. हिंदूंचा पुळका भागवत यांना पडतो. हे हिंदुत्ववादी आहे. हे हिंदू नाही, मूळ हिंदू भारतीय आहेत. यांची भाषा हिंसक आहे. ते समाजाला बदनाम करत आहेत. भाजप बदनाम करते. धर्मभेद करण्याची शिकवण रेशीमबाग मधून दिली जाते, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.