महाराष्ट्र

Akola West : विजय अग्रवाल यांना भाजपमधूनच सुरुंग

Akola BJP : ‘टिपू सुलतान’चे कागदपत्र वापरत विरोधात छुपा प्रचार

Assembly Election : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपमधील अनेक जण सक्रिय झाले आहेत. विजय अग्रवाल यांच्या विजयासाठी नव्हे तर पराभवासाठी. भाजपमधील एका मोठ्या गटाने रविवारी (27 ऑक्टोबर) विजय अग्रवाल यांच्याशी संबंधित दोन फोटो व्हायरल केले आहेत. भाजपकडून टिपू सुलतान यांच्या नावाला नेहमीच विरोध होतो. परंतु अकोल्यात महानगरपालिकेच्या सभागृहाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले. या संदर्भातील प्रस्ताव विजय अग्रवाल यांनी मांडला होता. आता या प्रस्तावाचे फोटो भाजपच्या कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात येत आहेत. 

हिंदुत्ववादी संघटना नाराज

विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनाही नाराज झाल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांमधील अनेक जण विजय अग्रवाल यांना कसे पराभूत करता येईल यासाठी सक्रीय झाले आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ आहोत. परंतु अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपने तीच चूक केली आहे, जी लोकसभा निवडणुकीत केली होती. त्यामुळे आम्ही उमेदवारासाठी काम करणार नाही. पक्षनिष्ठा आडवी येत असल्यामुळे बंडखोरी करणार नसलो तरी फेवर मध्येही काम करणार नाही, असे अनेकांनी ‘द लोकहित’शी बोलताना सांगितले.

शिवसेनेवर लक्ष

विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये अनेकांची नाराजी तयार झाली आहे. त्यामुळे आता अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गट राजेश मिश्रा यांना उमेदवारी देतो का, याकडे अनेकांचे लक्ष आहे. राजेश मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास विजय अग्रवाल यांच्यापेक्षा मिश्रा बरे असे आता भाजपचे कार्यकर्ते बोलू लागले आहेत. अकोल्यात भाजपकडून विजय अग्रवाल यांच्यासह माजी महापौर अश्विनी हातवळणे यांनी उमेदवारी मागितली होती. याशिवाय माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी हे देखील मैदानात होते. मात्र त्यांना भाजपच्या काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी ‘आता आम्ही दारूवाल्याचे काम करायचे का?’ असे म्हणत हिणवले.

भाजपचे जुने पदाधिकारी असलेले डॉ. अशोक ओळंबे यांनी देखील उमेदवारी मागितली होती. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता, असे ते वारंवार सांगत आहेत. परंतु शब्दाचे पालन न झाल्यामुळे ओळंबे यांनी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. लवकरच ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भाजपपुढे मतांच्या विभाजनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. अशात राजेश मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास भाजपमधून त्यांना छुपा पाठिंबाच मिळणार आहे.

वर्चस्व..

विजय अग्रवाल हे देखील भाजपचे जुने पदाधिकारी आहेत. अकोला महानगरपालिकेत त्यांचे प्रचंड वर्चस्व आहे. एखादी फाइल मंजूर करून घ्यायची असल्यास किंवा थकलेले बिल काढायचे असल्यास अगदी विरोधी पक्षातील नगरसेवकही अग्रवाल यांची मदत घेतात. त्यामुळे महानगरपालिकेच्या वर्तुळात विजय अग्रवाल यांचे वर्चस्व निर्विवाद आहे. अशात त्यांच्याकडून भाजपचे अनेक पदाधिकारी दुखावले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. हेच दुखावलेले लोक आता विधानसभा निवडणुकीत डोकं वर काढणार आहेत. त्यामुळे अकोला पश्चिममध्ये विजय अग्रवाल आणि भाजप यांना विरोधी पक्षांसह पक्षांतर्गत हालचालींवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!