Ramtek Constituency : लोकसभा निवडणुकीत देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या रामटेक मतदार संघातील मतदारांनी अनपेक्षित कौल देत काँग्रेसला नवी उभारी दिली. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभे प्रमाणेच रामटेक विधानसभा क्षेत्राची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेहमीच शिवसेनेचा गड राहिलेल्या रामटेककडे सर्वांचे लक्ष लागूल आहे. मात्र यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि महायुतीतील शिवसेना अशी चुरस असल्याने अनेक इच्छुकांमध्ये दावेदार कोण ठरतो हे चुरशीचे ठरणार आहे.
आधीचे कट्टर शिवसैनिक आशिष जैस्वाल यांनी रामटेकमधून विधानसभेवर तिनदा सेनेचा झेंडा फडकाविला तर एक अपक्ष म्हणून बाजी मारली. महाविकास आघाडीच्या सत्तेत शिवसेनेला बिनशर्त पाठींबा देणारे जैस्वाल बंडात मात्र शिंदेंच्या सोबत गेले. एव्हाना त्यांना रामटेकचे तत्कालीन खासदार कृपाल तुमानेंचे देखील बळ मिळाले. मात्र ठाकरेंशी बंडाने शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाले असले तरी रामाच्या नगरीत मात्र कधीच बंडाला थारा मिळाला नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळेच तुमानेंना खासदार असूनही दुसरी संधी मिळाली नाही, एव्हाना काँग्रेसमधून आयात केलेल्या उमेदवारालाही यश मिळवून देता आले नाही. लोकसभेत महायुतीची आणि विशेषत: शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था ‘तेल गेले, तुपही गेले’ अशी झाली.
तुमानेंचा मोहिते होणार का?
कृपाल तुमाने यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला पण त्यांना लोकसभेची उमेदवारी सुद्धा (एकनाथ शिंदे गट शिवसेना ) देउ शकली नाही. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या लोकप्रियतेत घट होण्याची दाट शक्यता आहे. त्यांचाही सुबोध मोहीते होणार का? अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे. सुबोध मोहीते यांनी शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसचा हात हातात घेतला. मात्र आज सुबोध मोहीतेंचे नाव सुद्धा रामटेक क्षेत्रात दिसून येत नाही, असे जाणकार सांगतात.
रामटेक विधानसभा मतदारसंघात अनेक नेते आमदार होण्यास इच्छुक आहेत. माजी आमदार भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी हे इच्छुकांच्या यादीत प्रबळ दिसून येत आहेत. मात्र महायुती असल्याने ही जागा कोणाच्या वाटेला येईल यावर सर्व अवलंबून असेल. भाजप पक्षात प्रवेश करुन युवा नेतृत्व उदयसिंह यादव यांनी आपली दावेदारी कायम ठेवल्याने जैस्वाल, रेड्डी, यादव यांच्यात उमेदवारीवरुन रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसमध्येही राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसै, दुधाराम सव्वालाखे यांची नावे शर्यतीत असतील. माजी पंचायत समिती सभापती शरद डोणेकर, माजी नगराध्यक्ष शंकर चहादे, भारतीय जनता पक्षाचे योगेश वाडी भस्मे, प्रहार संघटनेचे युवा नेते रमेश कारेमोरे यांचा राजयोग असल्यास यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सुनिल केदार यांची या क्षेत्रातील मतदारांवर मजबूत पकड आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारावर ते शिक्का मोर्तब करतील, असा विश्वास जाणकार व्यक्त करीत आहेत. महाविकास आघाडीलाही जागा मिळाल्यास त्यात केदारांची भूमिका किंगमेकरची असणार आहे.